शहापूर तालुक्यातील 424 गावपाडे तहानले; माताभगिनींची पायपीट सुरू, 17 कोटींचा टंचाई आराखडा मंजूर

यंदा पावसाने जास्त वेळ मुक्काम ठोकला. सर्वत्र पाणीच पाणी झाले. तरीदेखील आतापासूनच शहापूर तालुक्यातील गावपाड्यांमध्ये राहणाऱ्या माताभगिनींची हंडाभर पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. ४२४ गावपाडे टंचाईग्रस्त असल्याचे जाहीर झाले असून १७कोटी २९ लाख रुपयांच्या आराखड्यास सरकारने मंजुरी दिली आहे. या पाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असून विंधन विहिरींची तसेच पाणी योजनांची दुरुस्ती केली जाणार आहे. प्रत्यक्षात टँकरने पाणीपुरवठा सुरू होईपर्यंत तरी आदिवासींना उन्हाचे चटके सहन करत पायपीट करावी लागणार आहे.

गेल्या वर्षी सुमारे दोनशे गावपाड्यांसाठी ४४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यासाठी सवातीन कोटी खर्च झाला होता. यंदा गावपाड्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून टंचाई आराखड्यानुसार ८७ गावे व २५१ पाडे अशा एकूण ३३८ गावपाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी चार कोटी खर्च अपेक्षित आहे. याशिवाय नळ पाणीपुरवठा योजनांच्या विशेष दुरुस्तीमध्ये ३६ गावपाड्यांचा समावेश असून त्यासाठी साडेसात कोटी खर्च होणार आहे.

  • पूरक नळ पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीमध्ये समाविष्ट असलेल्या २३ गावपाड्यांसाठी किमान साडेपाच कोटी खर्च अपेक्षित आहे. तसेच टंचाई आराखड्यातील २७ गावपाड्यांमध्ये नवीन विंधन विहिरी करण्यासाठी २७ लाख खर्च होणार आहेत.
  • एकूण ४२४ गावपाड्यांसाठी तब्बल १७ कोटी २९ लाख खर्च होणार आहे. धरणांच्या तालुक्यात मंजूर झालेल्या टंचाई आराखड्यातील आकडे कागदावर झळकत असताना ग्रामीण भागातील माताभगिनींना हंडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे.

टँकर लॉबी, दलालांचे फावले

तानसा, भातसा, मोडकसागर असे भव्य जलाशय असताना शहापूर तालुकवासीयांची तहान भागवण्यासाठी इगतपुरी तालुक्यावर अवलंबून राहावे लागते. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था असलेल्या शहापूर तालुक्याला वर्षानुवर्षे टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असून त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. गेल्या दहा वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी तब्बल २२ कोटी खर्च झाले आहेत. शहापुरातील पाणीटंचाईवर अद्यापही कायमस्वरूपी तोडगा न निघाल्याने टँकर लॉबी व दलालांचे मात्र चांगलेच फावले आहे.