चुका करून अडचणीत सापडल्यानंतरच भल्याभल्यांना शनिदेवाची आठवण येते; रोहित पवार यांचा कोकाटेंना टोला

साडेसाती मुक्ती स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदूरबारमधील शनिमांडळ येथील शनि महाराज मंदिरात अभिषेक आणि पूजा अर्चा करून विरोधकांवर विजय मिळावा अशी प्रार्थना माणिकराव कोकाटे यांनी केली आहे. शनी मंदिरात जाऊन शनि देवाची विधिवत पूजा करत विरोधकांच्या साडेसातीतून मुक्ती मिळावी म्हणून या साडेसाती मुक्ती ठिकाणांचे त्यांनी दर्शन घेतले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कोकाटे यांना जहरदस्त टोला लगावला आहे.

रोहित पवारांनी एक्सवर याबाबत पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, तुम्ही चुका करा मी तुमच्या पाठीशी आहे, असं शनिमहाराज कधीही सांगत नाहीत. तरीही चुका करून अडचणीत सापडल्यानंतरच भल्याभल्यांना शिंगणापूरच्या शनिदेवाची आठवण येते…स्वार्थासाठी कोणत्याही मंत्र्याने शनिदेवाला कितीही तेलाचा अभिषेक केला तरी राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या कृषि विभागाला आणि मागासवर्गीय समाजाच्या समाजकल्याण विभागाला लागलेली पिडा आणि ती लावणारे या दोघांनाही दूर कर, अशी मी शनिमहाराजांना प्रार्थना करतो!, असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

कोकाटे हे शेतकऱ्यांच्या मागे लागलेली ‘साडेसाती’ – रोहिणी खडसे

रोहिणी खडसे यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करत म्हटले आहे की, विरोधकांच्या आरोपाच्या साडेसातीतून सुटका व्हावी म्हणून मंत्री मणिक कोकाटे यांनी शनी देवाची पूजा केली आहे, त्यांना साकडे घातले आहे अशी बातमी वाचली. खरंतर मंत्री कोकाटे खुद्द शेतकऱ्यांच्या मागे लागलेली ‘साडेसाती’ आहेत. या साडेसातीपासून शेतकऱ्यांची सुटका झाली तर शनी देवाच्या दर्शनाला जाईल, असे म्हणत त्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर रोहिणी खडसे यांनी हल्लाबोल केला.

नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळ येथील शनी मंदिर देशातील एकमेव साडेसाती मुक्तपीठ म्हणून म्हणून ओळख आहे. अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या जीवनाची राजकीय सुरुवात याच मंदिराच्या दर्शनापासून केले आहे. चारही बाजूंनी टीका होत असताना राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनि देवाच्या चरणी नतमस्तक होऊन विरोधकांच्या साडेसातीतून आपल्याला मुक्ती मिळावी अशी प्रार्थना केली आहे.