शनिशिंगणापूर देवस्थानचे प्रशासकीय कार्यालय सील, प्रशासकपदाचा कार्यभार स्वीकारताच जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई

देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनिशिंगणापूर देवस्थानात भ्रष्टाचाराचे ढग आणखी गडद झाले आहेत. देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर आज तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानच्या प्रशासकपदाचा कार्यभार स्वीकारताच जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी कडक कारवाई करत देवस्थानचे प्रशासकीय कार्यालयाला सील ठोकले.

राज्य सरकारने सोमवारी (22 रोजी) श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त करून अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांची देवस्थानच्या प्रशासकपदी नियुक्ती केली. त्यानंतर आज जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी शनिशिंगणापूर येथे दाखल होत देवस्थानच्या प्रशासकपदाचा कार्यभार स्वीकारला. येथील उदासी महाराज मठात त्यांनी विधिवत अभिषेक केला. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे, तहसीलदार संजय बिराजदार उपस्थित होते. जिल्ह्यात पूरस्थिती असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सत्कार घेण्याचे टाळले. त्यानंतर त्यांनी प्रशासकीय कार्यालयाची पाहणी केली. त्यानंतर त्यांच्या आदेशाने तलाठी व महसूल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी देवस्थानचे प्रशासकीय कार्यालय सील केले. यामध्ये अकाऊंट, सिव्हिल, संगणक कार्यालयीन अधीक्षक या महत्त्वाच्या विभागांचा समावेश आहे. दरम्यान, भ्रष्टाचाराशी संबंधित पुरावे नष्ट केले जाऊ नयेत, म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ग्रामस्थांच्या साक्षीनेच कारवाई

या कारवाईदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. कारवाईवेळी कार्यकारी अधिकारी कार्यालयात हजर नव्हते. त्यांच्या गैरहजेरीमुळे प्रशासनावरील संशयाचे सावट अधिकच गडद झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या कारवाईवेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. त्यांच्या साक्षीनेच कार्यालय सील करण्यात आले. शनिशिंगणापूरसारख्या राष्ट्रीय स्तरावर ओळख असलेल्या देवस्थानात जिल्हाधिकाऱ्यांची अशी धडक कारवाई होणे ही अभूतपूर्व घटना मानली जात असून, यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.