
ज्योतिर्मठचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार आणि प्रशासनाला धारेवर धरले आहे. शंकराचार्यांनी योगी सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. 10 मार्चपर्यंत उत्तर प्रदेश सरकारने गाईला ‘राज्यमाता’ म्हणून घोषित केले नाही तर, सरकारला ‘बनावट हिंदू’ आणि ‘ढोंगी’ मानले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
गोमांस विकून तुम्ही डॉलरने रामराज्य स्थापन करणार? गोमांसला म्हशीचे मांस सांगून आपला बचाव करता. पुढील ४० दिवसांत तुम्ही गोमातेला राज्यमाता घोषित न केल्यास तुम्हाला बनावट हिंदू घोषित केले जाईल, असा इशारा शंकराचार्यांनी दिला. आता मुद्दा असली आणि नकली हिंदूचा आहे, असे शंकराचार्यांनी ठणकावले.
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी महाराष्ट्र आणि नेपाळचा दाखला दिला. उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्याकडून काहीतरी शिकावे, असे आवाहन केले. जर विहित मुदतीत मागणी मान्य झाली नाही तर, 10 मार्च रोजी दिल्लीला जाण्याऐवजी सर्व संत, महंत आणि आचार्यांसह लखनौमध्ये एकत्र येऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असे त्यांनी ठणकावून सांगितले. एकतर तुम्ही हिंदू आहात हे सिद्ध करा, अन्यथा तुमचे भगवे कपडे उतरवा, अशा कठोर शब्दांत त्यांनी सरकारला सुनावले आहे.
प्रयागराज माघ मेळाव्यात प्रशासनाशी झालेल्या वादानंतर शंकराचार्यांनी आता थेट सरकारला त्यांच्या हिंदुत्वावरून वाराणसी येथे आयोजित पत्रकार परिषदेत आव्हान दिले आहे. प्रशासनाने आमच्याकडे शंकराचार्य पदाचा पुरावा मागितला होता. आता आम्ही सरकारकडे ते हिंदू असल्याचा पुरावा मागत आहोत, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
शंकराचार्य म्हणाले की, केवळ भगवे कपडे परिधान करणे किंवा भाषणे देणे म्हणजे हिंदुत्व नव्हे. हिंदू असण्याची पहिली अट म्हणजे गोसेवा आणि गोरक्षण ही आहे. उत्तर प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गोमांस निर्यातीवर बोट ठेवत त्यांनी सरकारला धारेवर धरले. देशातील एकूण गोमांस निर्यातीपैकी जवळपास 40 ते 50 टक्के निर्यात एकट्या उत्तर प्रदेशातून होते, असा दावा केला. तसेच सरकारला विचारले की, गोमांस विकून मिळणाऱ्या डॉलर्समधून तुम्ही रामराज्य स्थापन करणार का? गाईच्या मांसाला म्हशीचे मांस म्हणून समर्थन देणाऱ्यांनी आता स्वतःच्या हिंदुत्वाचा पुरावा द्यावा, असेही ते म्हणाले.


























































