
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांचा कालावधी संपण्याच्या आधीच राजीनामा दिले. ज्या पद्धतीने त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे संपूर्ण देशात संशयाचे वातावरण आहे. त्यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा का दिला ते अद्यापपर्यंत समजलेले नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सांगितले.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील इंडिया आघाडीचे उमेदवार सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व महाविकास आघाडीचे अन्य नेते उपस्थित होते. यावेळी शरद पवार व बी. सुदर्शन रेड्डी यांनी माध्यमांशी संवाद साधला.
विरोधकांचा सन्मान ठेवण्यासाठी निवडणूक
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील मतांच्या गणिताबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, महाराष्ट्रातील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची जी काही मर्यादित मते असतील. आमच्या सर्वांची जी काही ताकद आहे. ती त्यांच्या बाजूने असेल. महाराष्ट्र पूर्ण ताकदीने त्यांच्या मागे उभा आहे. लोकशाही पद्धतीत विरोधकांचा सन्मान ठेवण्यासाठी ही निवडणूक यशस्वी होईल याची मला खात्री आहे, विरोधकांच्या मतांची चिंता नाही. विरोधकांचे एकमत आहे. विरोधकांमध्ये एकमत आहे की मतांची फेरफार होणार नाही. असे त्यांनी ठामपणे सांगितले.
राधाकृष्णन यांची ‘ती’ गोष्ट विसरता येत नाही
उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांची एक गोष्ट मी विसरू शकत नाही ती म्हणजे झारखंडला राज्यपाल होते त्यावेळी राजभवनात आदिवासी मुख्यमंत्र्याला अटक झाली होती. तेथील मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना विनंती केली की मला इथे अटक करू नका मी बाहेर येतो. ऑफिसमध्ये येतो घरी जातो. पण राजभवनात अटक करू नका. मात्र राज्यपालांसमोर त्यांना अटक केली गेली, असे शरद पवार म्हणाले.