
हे सरकार आता बहिणींना दरमहा पंधराशे रुपये देत आहे, ठीक आहे. या 1500 रुपयांपेक्षा आमच्या भगिनींची अब्रू वाचवणे, त्यांना संरक्षण देणे याची खऱ्या अर्थाने गरज आहे, पण त्याच्याकडे या सरकारचे लक्ष नाही. लोकांची फसवणूक करण्याचे काम केले जात आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी लाडकी बहीण योजनेवरून मिंधे सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
धुळ्यातील शिंदखेडा येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी केंद्र व राज्यातील सरकार शेतकरीविरोधी असल्याची टीका केली. पवार म्हणाले, मी दहा वर्षे कृषी मंत्री म्हणून काम केले आहे. त्यावेळी देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. पण, आजच्या राज्यकर्त्यांना शेती आणि शेतकरी यांच्याविषयी काहीही आस्था नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्याने कष्टाने पीक घेतले. पण, मोदी सरकारने कांद्यावर निर्यातबंदी आणली. गहू, तांदूळ याबाबत हे घडलं. जे पिकवाल त्या धान्यावर, उत्पादनावर निर्यात बंदी. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. कृषीमंत्री असताना आपण देशातील शेतकऱ्यांचे 71 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतल्याचेही शरद पवार या वेळी म्हणाले.
महाराष्ट्रात गुंडगिरीचे राज्य
महाराष्ट्रात गुंडगिरीचं राज्य सुरू आहे. खोटे गुन्हे दाखल करण्यात येऊ लागले आहेत. दमदाटी करण्याचे प्रकार वाढले. लोकांना तुरुंगात टाकण्याचे प्रकार होऊ लागले आहेत. मागच्या दहा वर्षांत देशाचा विकास झालेला नाही. एकदा आमच्या हाती सत्ता द्या. महाराष्ट्राचा चेहरा तुम्हाला बदलेला दिसेल, अशी खात्री मी तुम्हाला देतो, असे शरद पवार म्हणाले.
सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज
सत्तेचा माज सरकारच्या डोक्यात गेला आहे. सत्ता ही लोकांच्या कामांसाठी असते. पण काही लोकांच्या हातात सत्ता आल्यानंतर ती डोक्यात शिरते आणि सत्तेचा गैरवापर होतो. ही राज्याची सत्ता चुकीच्या लोकांच्या हातामध्ये आहे. ती सत्ता उद्या संधी मिळाल्यानंतर त्यांच्या हातातून काढून घेणे आणि महाविकास आघाडीच्या हातात देणे हे काम तुम्हाला करायचे आहे, असे आवाहन शरद पवार यांनी केले.