
एवढय़ा घाईघाईत सुनेत्रा पवार यांचा शपथविधी का केला? याबाबत मला काहीच माहिती नाही. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलच सर्व ठरवत असल्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेसचे विलीनीकरण व्हावे ही अजित पवार यांची इच्छा होती. 12 फेब्रुवारी ही तारीख त्यासाठी निश्चित करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गोंविद बाग येथील निवासस्थानी शरद पवार यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले, सुनेत्रा पवार यांच्याबरोबर माझी त्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. ज्या चर्चा मी ऐकतोय, त्या मुंबईत सुरू आहेत, मी येथे बारामतीत आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणे हा त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे. प्रफुल पटेल, सुनील तटकरे हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी आता प्राधान्याने काय करावं ते ठरवलेलं दिसत असल्याचे पवार म्हणाले.
‘आमच्या आणि अजित पवारांच्या पक्षाने एकत्र काम करण्यासंबंधी एकमत झाले होते,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
एकत्र यावे ही अजित पवारांची इच्छा!
अजित पवार आणि जयंत पाटील हे दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा करत होते. मात्र मधेच ही दुर्दैवी घटना घडली. आता ही चर्चेची प्रक्रिया थांबेल असे दिसते. राष्ट्रवादीचे दोन्ही पक्ष एकत्र यावेत, ही अजित पवारांची इच्छा होती. त्यांची इच्छा पूर्ण व्हावी, ही आमची इच्छा आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
भाजपचा काय संबंध, आमची चर्चा सुरू होती
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या आणि याबाबत चर्चाही सुरू होती, असे तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही भाजपाबरोबर म्हणजे महायुतीबरोबर जाणार होतात का? या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले की, यात भाजपाचा काय संबंध? आमची जी चर्चा सुरू होती, त्यात असा कुठला प्रश्न चर्चेत नव्हता.
दिल्लीला निघाले, मला काही माहीत नाही – सुप्रिया सुळे
मला यातलं काही माहिती नाही, ‘उद्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्यामुळे मला दिल्लीला जावं लागत आहे. आता माझी फ्लाईट असून मी दिल्लीला चालले आहे,’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
























































