पुन्हा एकत्र येताना वसंतदादांनी पक्षहिताचाच विचार केला

‘तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे सरकार घालवल्यानंतर मी मुख्यमंत्री झालो. त्यानंतर दहा वर्षांनी पुन्हा आम्ही सगळे एकत्र आलो. त्यावेळी पक्ष पुन्हा एकदा सावरायचा असेल तर पक्षाचे नेतृत्व शरदकडे द्यावे लागेल, असा निर्णय वसंतदादांनी घेतला. ज्या व्यक्तीचे सरकार मी पाड़ले, त्या व्यक्तीने मी काय केले ही गोष्ट मोठय़ा अंतःकरणाने विसरून गांधी-नेहरूंचे विचार मजबूत करण्यासाठी एकत्रिकरणाची भूमिका मांडली,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.

‘सॅटर्डे क्लब’तर्फे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यात ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, गेल्या 14 दिवसांत त्या ठिकाणी काहीच काम झालेले नाही. आम्ही रोज त्या ठिकाणी जातो. सही करतो. त्यानंतर आत गेल्यावर दंगा सुरू होतो आणि काम बंद पडते. अशा प्रकारची परिस्थिती पूर्वी नव्हती. राज्यकर्त्यांकडून ज्या पद्धतीने संसदीय कामकाज सुरू आहे, ते लोकशाहीला आणि संसदीय लोकशाहीला न पटण्यासारखे आहे. हे चित्र बदलण्यासाठी आम्ही सर्वजण दिल्लीमध्ये एकत्र बसलो. यात मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्यासह इतर पक्षांतील वरिष्ठ नेते होते. सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेण्याचे ठरवून संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच तीनशे खासदारांनी आंदोलन केले. मात्र, आम्हा तीनशे लोकांना पोलिसांनी अटक करून पोलीस स्टेशनला नेले. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही आवाज उठवला आणि त्या विरोधात सत्ताधाऱ्यांनी ही कृती केल्याचे त्यांनी सांगितले.