
बीड जिह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधी पक्षांनी रान उठवले आहे. या प्रकरणातील आरोपी आणि सूत्रधारांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून वेगवेगळ्या मंचांवरून केली जात आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्येतील मोकाट गुंडांपासून राज्यातील लोकप्रतिनिधींच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांना तातडीने कडक सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली.
संतोष देशमुख हत्या प्रकरण माणुसकीला काळिमा फासणारे आहे, असे शरद पवार यांनी या पत्रामध्ये नमूद केले आहे. या क्रूर घटनेला भलामोठा काळ उलटून गेला असला तरी देशमुख यांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे. त्यामुळे, या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे निदर्शनास येते, असे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घ्यावे
बीड-परळी भागात यापूर्वी देखील माणुसकीला काळिमा फासणाऱया अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या गुंड प्रवृत्तीची पाळेमुळे खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे व त्यासाठी ते सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करत आहेत. असे असताना याच गुंडांपासून या लोकप्रतिनिधींच्या जिवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधींच्या व इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे, अशी मागणी शरद पवार यांनी पत्रातून केली आहे. सोशल मीडियावर त्यांनी हे पत्र पोस्ट केले आहे.
पुरावे नष्ट होत आहेत, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या – काँग्रेसची मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील धागेदोरे, पुरावे नष्ट होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप होत असलेले मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा सरकारने तातडीने घेतला पाहिजे अशी मागणी काँग्रेसने आज केली. या प्रकरणातील मुख्य संशयित वाल्मीक कराड याच्यावर 302 चा गुन्हा दाखल करा, असाही काँग्रेसचा आग्रह आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेत ही मागणी केली. दरम्यान, भुजबळ यांच्यावरही आरोपच झाले होते, मग त्यांना तुरुंगात का जावे लागले? त्यावेळच्या लोकांना शहाणपणा कळला नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विलासराव देशमुख, आर. आर. पाटील यांच्यासह अनेक मंत्र्यांनी राजीनामा दिल्याची उदाहरणे आहेत, असे ते म्हणाले.