बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा राज कुंद्रा सध्या कोर्ट कचेरीच्या कायदेशीर बाबींमुळे चर्चेत असतात. नुकताच शिल्पा शेट्टीवर बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या खासगी कार्यक्रमांमुळे सर्व सामान्यांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे अभिनेत्रीसह इतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच अभिनेत्री शिल्पा आणि तिचा नवरा राज कुंद्रा यांच्याशी संबंधित आणखी एक बातमी समोर येत आहे. शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांनी ED ने पाठवलेल्या नोटीसविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, शिल्पा आणि राज कुंद्राला ED कडून एक नोटीस बजावण्यात आली होती. शिल्पा आणि राज यांच्या मुंबईतील जुहू भागातील त्यांचे फार्म हाऊस रिकामे करण्यासाठी ही नोटीस पाठवण्यात आली होती. या प्रकरणी शिल्पा आणि राज यांनी आता ईडीच्या नोटीसविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ईडीने पाठवलेल्या नोटीसला आव्हान देत शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील केले आहे.
दरम्यान ईडीने पाठवलेल्या नोटीसमध्ये त्यांच्या आणखी एका बंगल्याचा समावेश आहे. पुण्यातील पवना धरणाजवळ असलेला त्यांचा बंगला रिकामा करण्याचे आदेश नोटीसद्वारे देण्यात आला. याप्रकरणावर 9 ऑक्टोबरला सुनावणी होणार होती. मात्र न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या विभागीय शाखेने बुधवारी ईडीला नोटीस बजावली आणि गुरुवारी 10 ऑक्टोबर रोजी याप्रकरणावर सुनावणी ठेवली आहे.