
अदानी कंपनीच्या प्लाण्टमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना नगरसेवक जोसेफ कोळी गेले होते. त्यावेळी अदानींच्या गुंडांनी पोलिसांच्या मदतीने कोळी यांना जबर मारहाण केली. त्या मारहाणीत कोळी यांचा एक हात जायबंदी झाला. प्लाण्टविरुद्ध बोलणाऱया अनेक नागरिकांनाही पोलिसांनी दमबाजी करत दंगलीचे गुन्हे दाखल करू अशी धमकी दिली. त्याविरोधात शिवसेना आणि काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी शनिवारी शाहूनगर पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन केले. अदानींसाठी धारावीकरांवर जुलूम करणाऱया शाहूनगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची हकालपट्टी करून संबंधित अधिकाऱयांवरही कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली.
शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, शिवसेना आमदार महेश सावंत, काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड यांनी शाहूनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी ठिय्या मांडला होता. त्यात धारावी बचाव आंदोलनाचे नेते, माजी आमदार बाबुराव माने, नगरसेवक हर्षला शिंदे, टी. एम. जगदीश, साईनाथ दुर्गे, विठ्ठल पवार, सुरेश सावंत, महादेव शिंदे, गंगा देरबेर, राजू कांबळे आदी सहभागी झाले होते.
नगरसेवकाला मारहाण होणे निषेधार्ह
अनिल देसाई यांनी याबाबत माहिती दिली. ‘रेडीमिक्स प्लाण्टमुळे प्रदूषण होते, जीवघेणे विकार होतात. त्यामुळे पेंद्र सरकारने त्याविरोधात कडक नियम बनवले आहेत. चेंबूर येथे अशाच कारणास्तव स्थानिकांच्या आंदोलनानंतर प्लाण्ट बंद करावा लागला होता. धारावीकरही रेडीमिक्स प्लाण्टमुळे त्रस्त आहेत. त्यांची समस्या मांडायला गेलेल्या नगरसेवक कोळी यांना मारहाण होणे हे निषेधार्ह आहे. त्यासंदर्भात एफआयआर दाखल करण्यासही शाहूनगर पोलिसांनी टाळाटाळ केली. शाहूनगर पोलीस ठाण्यातील अधिकारीही यात गुंतले असल्याने त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवरही कारवाई झाली पाहिजे,’ असे अनिल देसाई म्हणाले. पोलीस ठाण्यातून अनिल देसाई व अन्य लोकप्रतिनिधींनी पोलीस उपायुक्त महेंद्र पंडित यांच्याशी संपर्प साधून संबंधित पोलीस अधिकाऱयांवर कारवाई करा, अशी मागणी केली.





















































