अडीच वर्षांतल्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी मुंबईची वाट लावली, आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला

गेल्या अडीच वर्षांत राज्यात मुख्यमंत्री नव्हते, तर घटनाबाह्य व्यक्ती बसली होती. त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे मुंबईची अवस्था वाईट झाल्याची टीका शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केली. मुंबईत पेंग्विन आणले म्हणून टीका करणाऱयांचाही त्यांनी समाचार घेतला. आम्ही पेंग्विन दाखवतो, तुम्ही हिंदुस्थानात आणलेले चित्ते दाखवा, असा टोला त्यांनी भाजप आणि महायुती सरकारला लगावला.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ‘मुंबईचा आदित्योदय 2025’ कार्यक्रमाचे आयोजन रंगशारदा सभागृह समोर, बॉम्बे (मुंबई) आर्ट सोसायटी, वांद्रे पश्चिम येथे करण्यात आले होते. त्यात दिनदर्शिका प्रकाशन आणि आदित्य ठाकरे यांची मुलाखत झाली.

आदित्य ठाकरे यांनी मुलाखत देताना मुंबई महापालिका निवडणुकीचे व्हिजन मांडले. कोस्टल रोड, मराठी शाळा, कांदळवने, ईव्ही वाहने आदी अनेक मुद्दय़ांवर त्यांनी आपली सडेतोड मते मांडली. पत्रकार कीर्तिकुमार शिंदे आणि सौरभ शर्मा यांनी ही मुलाखत घेतली.

काही दिवसांपूर्वीपासून मुंबईत प्रदूषण वाढलेय. मुंबईतील पर्यावरण रक्षणासाठी आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने गोराईत कांदळवन उद्यान उभारले गेले होते. तसा प्रयोग अन्य ठिकाणी का झाला नाही, असा प्रश्न यावेळी आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, कांदळवने आहेत तिथे डास असतात असे समीकरण बनले आहे. बीकेसीचा विकास करण्यापूर्वी तिथे कांदळवनेच होती. नंतर मोठय़ा इमारती उभ्या राहिल्या. गोराईप्रमाणे आम्ही सिंधुदुर्गातही कांदळवने वाचवण्यासाठी तिथे महिलांना फार्मिंग करता यावे म्हणून आंतरराष्ट्रीय निधी आणला होता, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबईमध्ये यापुढचे आव्हान हे घरांचे असणार आहे. अदानी मुंबई गिळायला आले आहेत. गेल्या पाच वर्षांच्या राजकारणावर लक्ष दिल्यास आर्थिक शक्ती हलवायला एक शक्ती काम करतेय असे दिसतेय. आम्ही कामे करून दाखवली आणि लोकांसमोर मांडली. खोटी आश्वासने आमच्याकडून कधीच दिली गेली नव्हती. बीडीडी चाळी 100 वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यातील साडेपाच हजार कुटुंबांना महाविकास आघाडी सरकारच्या प्रयत्नांतून 500 स्क्वेअर फुटांची घरे देणार आहोत. हा आगळा वेगळा प्रोजेक्ट आहे.

मराठीसोबत अन्य भाषाही शिकणे गरजेचे

मराठी आलीच पाहिजे, त्यासोबत जेवढय़ा भाषा शिकता येतील तेवढय़ा आपण शिकल्या पाहिजेत. आपल्याला तीन ते चार भाषा यायला पाहिजेत, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. मी आणि माझे आजोबा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एकमेकांना डिक्शनरी भेट द्यायचो. फ्रेंच भाषा शिकायला त्यांनी मला प्रोत्साहन दिले, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

बाळासाहेब ठाकरे स्मारक एक शक्तिस्थळ असेल

बाळासाहेब ठाकरे स्मारकाची एक झलक आम्ही दाखवणार आहोत. त्याच्या पहिल्या फेजचे काम झाले आहे. हे स्मारक एक प्रेरणास्थान, शक्तिस्थान असणार आहे. अनेकांना त्यातून प्रेरणा मिळेल असे हे स्मारक असेल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.