
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई व अन्य शहरांतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांवरून (एसआरए) आज मिंधे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. हिंमत असेल तर सरकारने अनेक वर्षांपासून रखडलेले एसआरए प्रकल्प पूर्ण करावेत आणि मुंबईतील बहुमजली झोपड्या वैध ठरवून त्यांनाही घरे द्यावीत, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले.
आदित्य ठाकरे यांनी आज विधान भवनाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे तसेच खोके सरकारचेही शेवटचे अधिवेशन आहे असे ते म्हणाले. अर्थसंकल्पात खोके सरकारने फक्त गाजरे दाखवली. मुंबई आणि मुंबई प्रदेशातील इतर शहरांसाठी काय दिले अशी विचारणा आम्ही सरकारला केली होती. बीडीडी चाळींचा विकास जसा केला तसाच पंत्राटदार नेमून रखडलेल्या एसआरए प्रकल्पांचा विकास करावा आणि बहुमजली झोपड्यांचाही पात्रता यादीमध्ये समावेश करावा अशी मागणी शिवसेनेने केली होती. मुंबई व प्रदेशासाठी केलेल्या त्या मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या मुद्द्यावरूनही आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारवर टीका केली. 2022 च्या मार्चमध्ये गोरेगाव- मुलुंड लिंक रोडचे महाविकास आघाडी सरकारने भूमिपूजन केले होते. कामही सुरू झाले होते. एका टनेलसाठी टेंडर काढले गेले होते, परंतु महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर खोके सरकारने आवडत्या पंत्राटदाराला दोन्ही टनेलचे काम दिले. मात्र 2022 ते 2024 या दोन वर्षांत काहीच काम झाले नाही. आता पुन्हा त्याचे पंतप्रधानांकडून भूमिपूजन केले जाणार आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
काहीच काम केले नाही आणि आता पुन्हा त्याचेच उद्या भूमिपूजन करत आहात, असा संतप्त सवाल सरकारला करतानाच आदित्य ठाकरे यांनी, पंतप्रधान हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांना असे पुनः पुन्हा आणून त्यांचा व देशाचा अवमान करत आहात, असा हल्लाबोल केला. मुंबईतील सहा हजार कोटींचा रस्त्याचा घोटाळा समोर आणला होता, पण मिंधे सरकारने पंतप्रधानांना आणून त्याचे भूमिपूजन केले, पण त्यातील एकही रस्ता अद्याप पूर्ण झालेला नाही. कोस्टल रोडच्या कामासाठीही आणणार होते, पण कोस्टल रोडही पूर्ण उघडलेला नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. आता स्वतः पंतप्रधानांनी यामध्ये लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
कळत नसेल तर अधिकाऱ्यांना विचारा, कामाची वाट का लावता?
मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-नाशिक महामार्ग, मुंबई-अहमदाबाद महामार्गांच्या दुरवस्थेवरूनही यावेळी आदित्य ठाकरे यांनी यावेळी टीका केली. मुंबई-नागपूर महामार्गही खराब अवस्थेत आहे, असे ते म्हणाले. ठरलेल्या कालमर्यादेप्रमाणे कोस्टल रोडचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण व्हायला हवे होते. अटल सेतूचे काम मागच्या ऑक्टोबरमध्ये व्हायला हवे होते, हेसुद्धा आदित्य ठाकरे यांनी निदर्शनास आणले. वरळी-शिवडी कनेक्टरचे काम महाविकास आघाडीच्या काळातच 48 टक्के पूर्ण झाले होते. त्यानंतर आतापर्यंत फक्त 57 टक्केच काम पूर्ण झाले आहे, असे सांगतानाच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. एमएसआरडीसीचे खाते घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यांना काम कळत नसेल तर त्यांनी अधिकाऱ्यांना विचारायला हवे, असा टोला त्यांनी लगावला.