आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस; राज्यभरात आज विविध सामाजिक उपक्रम

शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस असून यानिमित्त शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने मुंबईसह राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचा मोठा उत्साह शिवसैनिक आणि युवासैनिकांमध्ये पाहायला मिळत आहे. राज्याच्या विविध भागांत वाढदिवसाच्या आठवडाभर आधीपासूनच सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. उद्याही ठिकठिकाणी सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यात विद्यार्थी गुणगौरव, रक्तदान शिबीर, महाआरोग्य शिबीर, मोफत शस्त्रक्रिया, मोफत अन्नदान, रुग्णांना फळवाटप, विद्यार्थ्यांना सायकल वाटप, वृक्षारोपण, क्रीडा स्पर्धा अशा उपक्रमांचा समावेश आहे.

11 ते 5 या वेळेत शुभेच्छांचा स्वीकार करणार

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज्याच्या कानाकोपऱयातून शिवसैनिक मुंबईत येतात. सकाळपासूनच मातोश्री निवासस्थानी शिवसैनिक दाखल होत असतात. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी सर्वांनाच नम्र आवाहन केले आहे. त्यानुसार आदित्य ठाकरे सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत तमाम शिवसैनिक आणि युवासैनिकांच्या शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत.