आषाढी एकादशीनिमित्त शिवसेनेकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन

आषाढी एकादशीनिमित्त शिवसेनेकडून मुंबईत मोफत तुळशीचे वाटप, वारकऱ्यांसाठी मोफत प्रथमोपचार केंद्र व आरोग्य चिकित्सा शिबीर तसेच राजगिरा लाडूंचे मोफत वाटप यासारखे उपक्रम राबवण्यात आले. शिव आरोग्य सेनेच्या वतीने वडाळा येथील विठ्ठल रखुमाई मंदिर येथे वारकऱ्यांसाठी मोफत प्रथमोपचार केंद्र व आरोग्य चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले.

मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथ हेगडे यांच्या हस्ते तुळस आणि राजगिरा लाडूंचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते खासदार विनायक राऊत, आमदार महेश सावंत, श्रद्धा जाधव, अनिल कोकिळ, उर्मिला पांचाळ आदी मान्यवरांनी भेट दिली. यावेळी शिव आरोग्य सेनेचे राज्य सरचिटणीस जितेंद्र सकपाळ, अमोल वंजारे, ज्योती भोसले, डॉ. प्रशांत भुईबर, एकनाथ अहिरे, डॉ. संतोष भानुशाली, डॉ. शशिकांत मोरे आदी उपस्थित होते.

प्रबोधन कुर्ला पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या वतीने बाल वारकरी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. टाळ-मृदुंगाच्या गजर आणि ठिकठिकाणी रिंगण सोहळा करत बाल वारकऱ्यांनी विठू माऊलीची पालखी शाळेपासून सर्वेश्वर मंदिरापर्यंत नेली. या वेळी विठू माऊलीच्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले. डॉ. माया मल्होत्रा, क्षमा गडकरी, नीता शुक्ला, आसावरी जोशी-बोधनकर, मंजिरी नाईक, संस्थेचे अध्यक्ष डॉ. भाऊ कोरगावकर, विश्वस्त शलाका कोरगावकर, खजिनदार जयदीप हांडे, सदस्य नीलेश कोरगावकर, मुरलीधर लाकूडझोडे, सर्वेश्वर मंदिराचे संचालक विनायक गाढवे, मुख्याध्यापिका विशाखा परब, संतोष चिकणे आदी या वेळी उपस्थित होते.