
एसटी बसच्या तिकीट दरात 15 टक्के वाढ करून सर्वसामान्यांचा खिसा कापणाऱया महायुती सरकारला दणका देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज राज्यभरात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. आज छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडय़ात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत चक्का जाम आंदोलन केले.
एसटीची भाडेवाढ करून खासगीकरणाचा महायुती सरकारचा डाव आहे का, असा सवाल करत शिवसेनेने उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. एसटी भाडेवाढ तत्काळ मागे घ्या अशी मागणी करत शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत.
n सकाळी 11.30 वाजता राज्यातील प्रत्येक जिह्यातील प्रमुख एसटी डेपोजवळ शिवसेना चक्का जाम आंदोलन करणार आहे.
एसटी दरवाढीविरोधात आंदोलनाची पहिली ठिणगी मराठवाडय़ात पडली. मराठवाडय़ात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी चक्का जाम आंदोलन केले. छत्रपती संभाजीनगरात मध्यवर्ती बस स्थानकाच्या गेटसमोर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. ‘परिवहन मंत्री हाय हाय’, ‘भ्रष्टाचारी सरकार हाय हाय’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. नांदेड, हिंगोली, लातूरमध्येही शिवसैनिकांनी चक्का जाम आंदोलन करून दरवाढीचा निषेध केला.
दरवाढीची मला कल्पनाच नव्हती; मंत्र्याने केले हात वर
एसटीच्या तिकीट दरवाढीवरून महायुती सरकारच्या विरोधात सर्वसामान्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. या दरवाढीचे सुरुवातीला समर्थन करणारे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एकदम यू टर्न घेतला आहे. या दरवाढीची मला कल्पनाच नव्हती. अधिकाऱयांच्या चुकीमुळे भाडेवाढ झाली, असे सांगत प्रताप सरनाईक यांनी हात वरती केले आहेत. मात्र दुसरीकडे एसटीच्या ताफ्यात 25 हजार बसेस दाखल करण्यास वित्त मंत्री अजित पवार यांनी आज तत्त्वतः मान्यता दिली.