मुंबईत प्लॅस्टिक फुलांवर बंदी घालण्याची शिवसेनेची मागणी, महापालिकेची मात्र टोलवाटोलवी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरात प्लॅस्टिक फुलांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी शिवसेनेने मुंबई महापालिकेकडे केली आहे. यासंदर्भात शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी महापौरांना लेखी पत्र दिले. त्यावर महापालिकेने टोलवाटोलवीची भूमिका मांडली आहे.

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी मुंबई महापालिकेने यापूर्वीच प्लॅस्टिक पिशव्या व इतर वस्तूंवर बंदी घातली आहे. त्याच धर्तीवर प्लॅस्टिकच्या फुलांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी एका पत्राद्वारे महापौरांकडे केली. प्लॅस्टिक हे अविघटनशील असल्याने ते पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. सध्या अनेक सार्वजनिक व खासगी कार्यक्रमांमध्ये प्लॅस्टिकच्या फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचा पर्यावरणाला असलेला धोका लक्षात घेत प्लॅस्टिक फुलांच्या वापरावर बंदी लागू करण्याची मागणी सचिन पडवळ यांनी केली आहे.

पालिकेच्या भूमिकेवर तीव्र नाराजी

प्लॅस्टिक फुलांच्या बंदीसंदर्भात पालिका प्रशासनाने दिलेल्या उत्तरावर सचिन पडवळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई महापालिका जर राज्य सरकारच्या निर्णयाकडे बोट दाखवून प्लॅस्टिक फुलांवर बंदी घातल्याचे सांगत असेल तर मग पालिका प्रशासनाने लायसन्स विभागाला यासंदर्भात कोणत्या सूचना दिल्या आहेत, याचे स्पष्टीकरण पालिका आयुक्तांनी द्यावे, अशी प्रतिक्रिया सचिन पडवळ यांनी दिली.