दुर्घटना झाल्यावर चौकशीचे आदेश देण्यात येतात, त्या चौकशीचे पुढे काय होते? संजय राऊत यांचा परखड सवाल

अजितदादा पवार यांच्या जाण्याच्या धक्क्यातून महाराष्ट्र अून सावरलेला नाही. त्यांच्या पार्थिवाला कालच अग्नी देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत कोणी त्यांच्या नावानं राजकारण करत असेल तर ते सर्वस्वी चुकीचे आहे. हे अमानूषपणाचे लक्षण आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. या धक्क्यातून सावरण्यासाठी आपल्याला वाट पाहवी लागेल, असेही ते म्हणाले.

अजितदादा पवार यांच्या जाण्याच्या धक्क्यातून महाराष्ट्र अून सावरलेला नाही. त्यांच्या पार्थिवाला कालच अग्नी देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत कोणी त्यांच्या नावानं राजकारण करत असेल तर ते सर्वस्वी चुकीचे आहे. त्यांच्या कुटुंबियांवरचा आघात मोठा आहे. त्यांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे पुढचे 15 -20 दिवस राजकीय चर्चा करणे अमानूष आहे. अनेक विषय त्यांचे पक्षांतर्गत आणि कुटुंबाचे आहे. त्यावर कोणीही भाष्य करणे योग्य नाही. सर्व स्थिरस्थावर झाल्याशिवाय कोणीही या विषयावर बोलणार नाही. कोणी हा विषय काढला असेल तर ती माणूसकीशून्य लोकं आहेत. प्रसारमाध्यमांनीही या विषयाला फाटे फोडू नये, असे आवाहन त्यांनी केले.

या घटनेबाबत आपण केलेल्या दोन मागण्या अराजकीय आहेत. डीजीसीएच्या अखत्यारीत विमानसेवांचे नियोन येते. गेल्या काही महिन्यात विमान अपघातांमध्ये प्रमुख व्यक्तींचे निधन झाले आहे. अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले. त्यात सुमारे 300 जणांचा मृत्यू झाला. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे त्या अपघातात निधन झाले. अनेक कुटुंबे जळून खाक झाली. अशी दुर्घटना झाल्यावर चौकशीचे आदेश देण्यात येतात, त्या चौकशीचे पुढे काय होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

बारामती विमानतळावर रडार नव्हते, ईटीसी नव्हते, अशी माहिती मिळत आहे. कोणतीही एअरस्ट्रिप नसताना व्हीआय़पींची विमाने तिथे उतरत होती. हे खरे असेल तर त्याला डीजीसीए जबाबदार आहे. त्यामुळे अशा सर्व अपघातांची चौकशी होणे गरजेचे आहे. अजित पवारांसारखा महत्त्वाचा कामाचा माणून आपण या अपघातात गमावला आहे. स्टाफ आणि विमान संचलनासाठी गरजेची व्यवस्था नसलेली विमानतळे ते चालवतात, त्यामुळे या अपघाताची जबाबदारी डीजीसीएला घ्यावी लागेल, असेही ते म्हणाले.

अजितदादा पवार यांना राज्यातील सर्व पक्षांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. भाजपनेही श्रद्धांजलीसाठी वृत्तपत्रात पानभर जाहिराती दिल्या आहेत. हे कौतुकास्पद आहे. मात्र, याच भाजपने, पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी दादांवर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला. मात्र, त्यातील काहीच ते सिद्ध करू शकले नाहीत. त्यामुळे आपली अशी विनंती आहे की, दादांवर भाजपचे खरे प्रेम असेल तर पंतप्रधान मोदी, फडणवीस आणि भाजपने त्यांच्यावर केलेले आरोप त्यांनी मागे घ्यावेत. ही आपली अराजकीय मागणी आहे.

छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांच्यावरही भाजपने आरोप केले होते. ते सर्व निर्दोष ठरले आहेत. आमच्यावरही आरोप केले आम्ही तुरुंगात गेलो, आम्हीही निर्दोष ठरणार आहोत. मात्र, आता अजितदादा आपल्यात नाहीत. त्यामुळे 70 हजार कोटींचे खळबळजनक आरोप मागे घ्यावे, अशी आमची मागणी आहे. त्यांचयावरचे आरोप खोटे आणि तथ्यहीन असल्याने ते मागे घेण्यात यावे. निर्दोष व्यक्तीवर केलेले आरोप मागे घेणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.