
हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामना हा भाजपचा खेळ आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. यातून भाजपची राष्ट्रभक्ती उघड झाली आहे. टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट कसे खेळता? असा परखड सवालही राऊत यांनी भाजपला केला आहे.
हिंदुस्थान- पाकिस्तान क्रिकेट सामना आम्ही बघतच नाही. हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामना हा भाजपचा खेळ आहे. निवडणुका आल्यावर हिंदुस्थान-पाकिस्तान, हिंदू मुसलमान करायचे आणि राष्ट्रवाग, राष्ट्रभक्ती लोकांना शिकवायची, त्यावर मत मिळवायची. पाकिस्तानवर बहिष्कार टाकायचा, बांगलादेशींना हाकलायचे, असे त्यांचे उद्योग सुरू असतात. मात्र, पैशांचा आणि जुगाराचा विषय येतो, तेव्हा हिंदुस्थान-पाकिस्तान सामने खेळवण्यासाठी जय शहा यांना परवानगी दिली जाते, असा हल्लाबोल त्यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच टिपू सुलतानचा उल्लेख केला. तो क्रूरकर्मा होता, तरी त्याचे उदात्तीकरण करण्यात येत आहे, असे ते म्हणाले. पाकिस्तान टिपू सुलतानला नायक मानते. टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानबरोबर आपला संघ क्रिकेट खेळत असेल तर फडणवीस आणि त्यांच्या भाजपने याचा धिक्कार आणि निषेध करायला हवा. त्यामुळे भाजपची राष्ट्रभक्तीची उर्मी उचंबळून आली पाहिजे. मात्र, ते या सामन्यांचा निषेध करत नाहीत, कारण ते ढोंगी लोकं आहेत.
हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यातून त्यांना शेकडो कोटी रुपये मिळतात. हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यावर सर्वात जास्त जुगार खेळला जातो. गेल्या सामन्यातील बेटिंगमधून 25 हडजार कोटी पाकिस्तानात गेले, हे आपण आधीही सांगितले आहे. त्यातील काही वाटा सरकारमधील लोकांनाही जात असतो. पाकिस्तानात जाणारा हा पैसा पुलवामा, पहेलगाम हत्याकांड घडणवणाऱ्या दहशतवाद्यांपर्यंत पोहचतो. त्यामुळे हे पाप भाजपचे आहे. मोदी, शहा, फडणवीस यांची राष्ट्रभक्तीची ढोंगं आता उघडी पडत आहे. टिपू सुलतानचे नाव बगीच्यांना आणि काही ठिकाणांना देणारे आता सर्व भाजपत आहेत. फडणवीसांना याबाबत अभ्यास करावा, फडणवीस टिपू सुलतानवर टीका करतात, तर टिपू सुलतानाला नायक मानणाऱ्या पाकिस्तानसोबच क्रिकेट कसे खेळता, हा आपला प्रश्न आहे, असे ते म्हणाले.






























































