
सध्याच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षाचे एकीकरण झालेले दिसत आहे. ते एकाच चिन्हावर लढणार असल्याचे समजते. त्यामुळे आता याबाबत बोलण्यात काहीही अर्थ नाही. मात्र, आगामी काळात चित्र बदलणार आहे, असेही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
शरद पवार आणि अजित पवार यांचे पक्ष एकत्र होताना दिसत आहे. त्यामुळे आता शरद पवार अजित पवारांसह महाविकास आघाडीत असतील, असा आमचा विचार आहे. शरद पवार आणि त्यांच्या पक्ष आमच्यासोबत महाविकास आघाडीत आहे. अजित पवार महायुतीत असूनही त्यांनी महाविकास आघाडीसोबत पाट लावला आहे. त्यामुळे घडामोडी आणि कार्यवाही तिथे होईल. अजित पवार यांना काहीतरी सोडावे लागेल आणि काहीतरी स्वीकारावे लागेल, याचा निर्णय त्यांना घ्यावा लागेल, ते दोन दगडांवर पाय ठेवू शकत नाहीत. आगामी काळात शरद पवार अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील, असा आम्हाला विश्वास आहे, असे ते म्हणाले.
आता सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट दिली आहे. त्यामुळे मेले मेंढरू आगीला भीत नाही. स्वतः पंतप्रधानांनी त्यांच्या घोटाळ्याची माहिती देत गर्जना केली, तरीही ते सरकारमध्ये आहेत. आता कोणत्या तोंडाने ते अजित पवार यांची फाईल ओपन करणार आहेत. त्या फाईलमध्ये काही आहे की नुसत्याच तो पोकळ डरकाळ्या फोडत आहेत. छगम भूजबळ यांच्याविरोधात यांनी किती आरोप केले होते? भुजबळ अडीच वर्षे तुरुंगात होते. ती पहिली केस आहे. आता भुजबळ ईडीपासून ते पीडब्लूपर्यंत सर्व प्रकरणात निर्देष असल्याचा निकाल दिला. आता या बाबत राज्याच्या गृहखात्याने आणि ईडीने पायश्चित्त घेतले पाहिजे, असेही त्यांनी ठणकावले आहे.
जोपर्यंत भाजपकडे सत्ता आहे, तोपर्यंत सर्व तनाने, मनाने, धनाने भाजपसोबत राहणार. मात्र, ज्यावेळी सत्तापालट होईल, त्यावेळी त्यांची मने बदलतील आणि तनाने, मनाने, धनाने ते आमच्यासोबत असतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अजित पवार यांचे मन आजही त्यांच्या मूळ पक्षासोबत आणि कुटुंबासोबत आहेत, त्यामुळे त्यांचे मन कुठे आहे, ते स्पष्ट होते, असे ते म्हणाले. तसेच शरद पवारांसोबत ते महाविकास आघाडीत येण्याची शक्यता आहे.





























































