
देशाच्या पंतप्रधानांनी 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाल्याचे आरोप ज्यांच्यावर केले तेच उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे अर्थमंत्री झाले आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी केलेले आरोप खरे की खोटे हे त्यांनीच सांगावे असे आव्हान देत पंतप्रधानच खोटे आरोप करत असतील तर त्यांचा अख्खा पक्षच खोट्यावर उभा आहे, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार अरविंद सावंत यांनी केला.
खासदार अरविंद सावंत आज सायंकाळी कोल्हापुरात आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला.
लोकसभा निवडणुकीत भाजपला इंडिया आघाडीने धक्का दिला. आणखी जोर लावला असता तर सत्तापालट झाला असता; पण आता ही कसर विधानसभा निवडणुकीत भरून काढू. राज्यात सत्ताबदल व्हायलाच हवा त्यादृष्टीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, सोनिया गांधी तसेच केंद्रातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी कामाला लागली आहे. त्यामुळे राज्यात परिवर्तन घडणारच, असा ठाम विश्वास खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केला.
राज्यात अकरा विधानपरिषद जागांसाठी 12 जुलैला मतदान होत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार मिलिंद नार्वेकर हे अपेक्षेपेक्षा जास्त मते घेऊन निवडून येतील. याबाबत काळजी करण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गलिच्छ राजकारण महाराष्ट्राची संस्कृती नाही
मुंबईत पाऊस पडल्यानंतर एका ‘आरजे’ने मुंबई महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले होते. आता महापालिकेवर प्रशासकराज आहे. मुंबई महापालिकेत आमची सत्ता असती तर ती नाचायला आली असती, कोण मलिष्का… तिला जरा शोधून आणा, थोडासा पाऊस काय पडतो आणि नागपूर वाहून जाते, सत्ता कुणाची सांगण्याची गरज आहे का? थोडासा पाऊस पडतो आणि दिल्ली वाहून जाते, सत्ता कुणाची आहे हे सांगण्याची गरज आहे का? असे सवालही खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केले.
धनाढ्य आणि राजकारण्यांना सत्तेचा उन्माद
धनाढ्य आणि राजकारणी या दोन घटकांना सत्तेचा उन्माद आल्यानेच मुंबईतील वरळीच्या हिट ऍण्ड रन प्रकरणांत कारवाई होईल, असे वाटत नाही. राज्यात सत्ताधारी पक्षाचा आमदार पोलिसांना शिवीगाळ करतो. दुसरा आमदार हातपाय तोडा आणि माझ्याकडे या… मी ऑन टेबल जामीन देतो, अशी भाषा करतो, तर तिसरा थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळ्या घालतो, या सगळ्यांवर काय कारवाई झाली? आता कारवाई होईल असे वाटत नाही. कारण यांच्यासोबत लॉण्ड्री (वॉशिंग मशीन) आहे, असा टोला खासदार अरविंद सावंत यांनी लगावला.