
गिरगावातील वॉर्ड क्रमांक 218 मध्ये मतदान सुरू असताना संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या भाजपच्या एका कार्यकर्त्याला शिवसैनिकांनी पकडले. त्याच्या हातात मतदार याद्या आणि मतदारांच्या स्लिप होत्या. सदाशिव गल्लीत एका इमारतीखाली उभे राहून तो मतदारांना गाठण्याचे काम करत होता. त्याच्या एकूणच हालचाली संशयास्पद वाटल्याने शिवसैनिकांनी त्याला हटकले.
“इथे काय करतोस?” अशी विचारणा केल्यानंतर तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्याने नंदुरबारहून आल्याचे सांगत, साधारण २५ जण नंदुरबारवरून येथे आल्याचेही कबूल केले. शिवसैनिकांनी त्याला पकडताच त्याच्यासोबत असलेले इतर जण पळून जाण्यात यशस्वी झाले. पकडलेल्या कार्यकर्त्याला शिवसैनिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. मतदारांना गाठून पैसे वाटण्याचा डाव शिवसैनिकांनी यामुळे हाणून पाडला.
एका ठिकाणी ११ बूथ… मतदारांच्या रांगा
कुलाबा येथील वॉर्ड क्रमांक 225 मधील अग्निशमन दलाच्या मतदान केंद्रात एकूण ११ बूथ होते. त्यामुळे तेथे मतदारांची मोठी गर्दी झाली होती. मतदानासाठी मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.



























































