शीव रेल्वे पुलाच्या कामात खंड पडू देऊ नका! शिवसेनेची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

शीव रेल्वे पूल तोडून तिथे नवा पूल उभारला जाणार आहे. सध्या हा पूल वाहतुकीसाठी बंद करून तोडकाम सुरू आहे. मात्र हे तोडकाम काही कारणांनी थांबल्यामुळे रहिवाशांच्या गैरसोयीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. थांबलेले पुलाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी रेल्वे मंत्र्यांची दिल्ली येथे भेट घेऊन केली आहे.

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणारा शीव रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल 31 जुलैच्या मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नोव्हेंबर 2024पर्यंत हा पूल पाडून त्या जागी नवा पूल बांधण्यात येणार आहे. पुढील दोन वर्षांत हा पूल बांधून पूर्ण करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. या पुलासाठी लागणारा 51 कोटींचा खर्च पालिका करणार असून रेल्वेकडून हा पूल बांधून घेण्यात येणार आहे. मात्र रेल्वेने 112 वर्षे जुन्या पुलाचे पाडकाम सुरू करून पुन्हा थांबवले आहे. या मार्गावरील वाहतूक बंद असल्यामुळे दादर, शीव, वडाळा, वांद्रे, माहीम, माटुंगामध्ये वाहतूक काsंडी होत असून या भागातील विद्यार्थी, महिला, नोकरदार यांचे हाल होत आहेत. सणासुदीचे दिवस असल्यामुळे कुठेही खंड न पडू देता शीव रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू करावे, अशी आग्रही मागणी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी रेल्वे मंत्र्यांना निवेदन देऊन केली.

भाविकांसाठी विशेष रेल्वे गाडी सोडा!

संत निरंकारी मिशन यांचे 77वे वार्षिक समागम हरयाणामधील गनौर येथे 16 ते 18 नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भाविकांना तिथे कोणत्याही अडचणींशिवाय जाता यावे, यासाठी विशेष रेल्वे गाडी सोडावी, अशी मागणीही रेल्वे मंत्र्यांकडे करण्यात आली. या दोन्ही मागण्यांना रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.