उदयोन्मुख क्रिकेटपटूंना लाभणार नवी दिशा, शिवाजी पार्क जिमखाना- रोझ मर्कच्या सहकार्यामुळे क्रिकेट प्रतिभेला नवे बळ

हिंदुस्थानी क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे पाऊल टाकत शिवाजी पार्क जिमखान्याने क्रीडा व्यवस्थापन, इव्हेंट मॅनेजमेंट आणि वित्तीय सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या यांच्याशी धोरणात्मक सहकार्याची घोषणा केली आहे. या भागीदारीतून सुरू होणारी ‘एसपीजी-रोझ मर्क क्रिकेट अकादमी’ ही उदयोन्मुख आणि गुणवान क्रिकेटपटूंना व्यासपीठ देण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

शिवाजी पार्क जिमखान्याचे अध्यक्ष तसेच एसपीजी रोझ मर्क क्रिकेट अकादमीचे समन्वयक प्रवीण अमरे यांनी या सहकार्याचे मनापासून स्वागत केले. ‘शिवाजी पार्क हे नेहमीच हिंदुस्थानी क्रिकेटमधील दिग्गज आणि उदयोन्मुख खेळाडूंचे माहेरघर राहिले आहे. रोझ मर्कसोबतच्या या सहकार्यातून आम्ही पुढील पिढीला जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, आधुनिक सुविधा आणि आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत,’ असे अमरे यांनी सांगितले.

या भागीदारीबद्दल बोलताना रोझ मर्कचे कार्यकारी अध्यक्ष पूर्वेश शेलटकर म्हणाले, ‘शिवाजी पार्क जिमखान्यासारख्या प्रतिष्ठत संस्थेसोबत भागीदारी करणे हा आमच्यासाठी मोठा सन्मान आहे. उत्कृष्ट प्रशिक्षण व सुविधा उपलब्ध करून देत तरुण क्रिकेटपटूंना त्यांची स्वप्ने साकार करण्यास मदत करणे हेच आमचे ध्येय आहे.’

तसेच रोझ मर्कचे अध्यक्ष उदय तारदळकर यांनीही या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, ‘एसपीजीसोबतच्या या सहकार्याद्वारे आम्ही केवळ एका अकादमीत नव्हे, तर हिंदुस्थानी क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्यात गुंतवणूक करत आहोत.’

या सहकार्यामुळे शिवाजी पार्क जिमखान्याची गौरवशाली परंपरा अधिक बळकट होणार असून नव्या पिढीतील क्रिकेटपटूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी भक्कम व्यासपीठ मिळणार आहे.