बेकायदेशीर भाडेतत्त्वावर दिलेल्या रेशनिंग दुकानांचे परवाने रद्द करा, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे सरकारला निवेदन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
cancel licenses of illegal rented ration shops demands shivsena grakhak sanrakshan kaksha

रेशनिंगवर मिळणाऱ्या रेशनवर घर चालवणाऱ्या कुटुंबाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, मात्र या योजनांचा लाभ गरजवंतांना न होता या योजनेत कायमच मोठ्या प्रमाणात घोळ होत आहे. किंबहुना अनेक योजना बंद पडल्या आहेत. बेकायदेशीररीत्या भाडेतत्त्वावर रेशनिंग दुकानांना परवाने दिल्यानेच असे प्रकार घडत असून हे परवाने रद्द करण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने केली आहे. तसे निवेदनच त्यांनी सरकारला दिले आहे.

भाडेतत्त्वावर दुकाने चालवायला दिल्याने कोणत्याही नियमांचे पालन या दुकानदारांकडून केले जात नाही तसेच आलेल्या धान्यामध्ये भेसळ करून ग्राहकांच्या माथी मारले जात आहे. इतकेच काय, तर चांगले धान्य मोठय़ा दुकानदारांना विकून त्यातून आर्थिक लाभ हे घेत असल्याचे दिसून आले आहे. यावर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी करत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा विभागाकडे तक्रार केली आहे. ग्राहक संरक्षण कक्षाचे सचिव निखिल सावंत यांनी नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा विभागाचे संचालक चंद्रकांत डांगे यांची भेट घेतली. त्या वेळी खजिनदार देविदास माडये, कक्ष लोकसभा समन्वयक संजय पावले, कक्ष विधानसभा संघटक बळीराम मोसमकर, कृष्णकांत शिंदे, मधुकर कांबळे, सतीश नाटेकर, नितीन गंदाले, विक्रम शहा, बाळा रेडकर, विजय पवार आदी उपस्थित होते.