
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत म्हाडा व चढ्ढा विकासक यांचा पी.पी.पी अंतर्गत वांगणी अंबरनाथ येथे राबविण्यात येत असलेल्या संयुक्त प्रकल्पात लाभार्थ्यांना अद्याप घरे मिळालेली नाहीत. याबाबत विचारणा करण्यास गेल्यास गुंतवणूकदारांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. याची गंभीर दखल घेत ‘म्हाडा’, चढ्ढा डेव्हलपर्सच्या अंबरनाथ येथील प्रकल्पाची चौकशी करा, अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने ‘म्हाडा’कडे केली आहे.
म्हाडा प्राधिकरणाचे नाव व लोगो असल्यामुळे असंख्य ग्राहक येथे आकर्षित होत आहेत. परंतु शासनाने निश्चित केलेल्या रकमेपेक्षा काही लाख रक्कम जास्त विकास या लाभार्थ्यांकडून घेत असल्याची तक्रार शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाकडे प्राप्त झाली होती व दैनिक ‘सामना’मध्येदेखील या संदर्भात बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. अनेक वर्षे उलटली तरी अजूनपर्यंत एकाही लाभार्थ्याला या घराचा ताबा मिळालेला नाही. त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेत मोठय़ा प्रमाणात घोळ दिसून येत आहे. त्याच अनुषंगाने शिवसेना नेते,शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष, खासदार अनिल देसाई यांच्या आदेशानुसार शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे सचिव निखिल सावंत यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांची वांद्रे येथील कार्यालयात भेट घेऊन सदर प्रकरणाबाबत सविस्तर माहिती दिली.
प्रकरणाची सखोल चौकशी होणार
सदर सर्व माहिती धक्कादायक असून लवकरच याबाबत सखोल चौकशी करून एक संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल असे आश्वासन कार्यकारी अधिकारी जयस्वाल यांनी शिष्टमंडळास दिले.सदर शिष्टमंडळात खजिनदार देविदास माडये,कार्यकारिणी सदस्य बबन सकपाळ, कक्ष विधानसभा संघटक प्रथमेश जगताप, किरण काळे, शाखाप्रमुख सतीश कटके, आनंद जाधव वॉर्ड संघटक संतोष हिनुकले उपस्थित होते.