निफाडमधला सहकारी साखर कारखाना सुरू करा, संजय राऊत यांचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांना पत्र

नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील निफाड सहकारी साखर कारखाना 2013-14 च्या गळीत हंगामापासून बंद आहे. या कारखान्याताली कामगारांचे वेतन थकले आहे, या कारखान्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे, त्यामुळे हा कारखाना सुरु करा अशी मागणी करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे.

संजय राऊत यांनी पत्रात म्हटलंय की, नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील निफाड सहकारी साखर कारखाना 2013-14 च्या गळीत हंगामापासून बंद आहे. आर्थिक अनागोंदी व संचालकांच्या भ्रष्टाचारामुळे सहकारी तत्त्वावरील हा जुना कारखाना बंद पडला आहे. नाशिक जिल्हा बँकेची थकबाकी असल्याने बँकेने कारखाना मे.बी.टी. कडलग कन्स्ट्रक्शन प्रा.लि., नाशिक यांना 25 वर्षे मुदतीने भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला. तरीही हा कारखाना मे. कडलग कन्स्ट्रक्शनने अद्यापि सुरू केला नाही. कारखान्यातील कामगार व त्यांच्यावर असलेल्या कुटुंबाच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कामगारांची ग्रॅच्युईटी, वेतन, पगार थकले आहेत. ही थकबाकी कायम असताना, कामगार वर्ग न्यायासाठी संघर्ष करीत असताना नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कारखाना विक्रीचा घाट घातला आहे. यात फार मोठा गैरव्यवहार सुरू आहे असे संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.

तसेच निफाड सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीत स्थानिक राजकीय पुढाऱ्यांना कमालीचा रस आहे. या कारखान्यातील भंगार परस्पर विकून 25 ते 30 कोटींचा अपहार झाला पण आतापर्यंत कामगारांना त्यांचे थकीत वेतन मिळू शकले नाही. केंद्रीय सहकार मंत्रालयाने कठोर पावले उचलली तर हा कारखाना पुन्हा सुरु होईल व असंख्य लोकांच्या विझलेल्या चुली पेटतील. आपण स्वतः लक्ष घालून हा निफाड कारखाना पुन्हा सुरु करावा ही समस्त कामगारांची मागणी आहे.

निफाड साखर कामगार सभेतर्फे कामगारांचे प्रश्न मांडणारे निवेदन आपल्या माहितीसाठी सोबत जोडले आहे. आपण याबाबत लक्ष घालून कामगारांना न्याय द्यावा. कामगारांच्या प्रतिनिधींना दिल्लीत चर्चेसाठी बोलावल्यास बरे होईल असेही संजय राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे.