
दहशवादाविरोधात हिंदुस्थानने सुरू केलेले ऑपरेशन सिंदूर आपल्यामुळेच थांबले, असे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अनेकदा करत आहेत. अशी विधाने वारंवर करत ते हिंदुस्थानचा अपमान करत आहेत. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना जाब विचारत नाही, हा देशाचा अपमान आहे, तसेच देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यात हस्तक्षेप करणाऱ्या ट्रम्प यांच्यासमोर गप्प राहणे, हे कमजोर पंतप्रधान असल्याचे लक्षण आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.
दहशतवादविरोधी लढ्यात ऑपरेशन सिंदूरमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुसद्दीपणा दिसून आला, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. मात्र, हे त्यांचे वैयक्तीक मत आहे. देशाचे हेच मत असेल असे नाही. मुळात ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले आहे काय, अशी शंका जनतेच्या मनात आहे. दहशतवादाचा पूर्ण बिमोड करण्यासाठी ऑपरेशन सिंदूरची योजना होती. पाकिस्तानचे चार तुकडे करण्यासाठी ऑपरेशन सिंदूरची योजना होती. पाकिस्तानने पुन्हा कधी हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने पाहू नये, यासाठी ऑपरेशन सिंदूर होते. मात्र, ट्रम्प यांनी सांगितल्यानंतर हे ऑपरेशन थांबवण्यात आले. त्यांनी हा हस्तक्षेप का केला, असा सवालही त्यांनी केला.
आपल्यामुळे हे युद्ध थांबले आहे, असे ट्रम्प अनेकदा सांगत आहे. आता अमेरिकेने पाकिस्तानचे फिल्ड मार्शल असीम मुनार यांनी आर्मी डे परेडसाठी आमंत्रित केले आहे. हे कसले लक्षण आहे, असा सवालही त्यांनी केला. ऑपरेशन सिंदूरच्या भूमिकेला छेद देणारे वक्तव्य ट्रम्प करत आहेत. ट्रम्प आपणच युद्ध थांबवल्याचा दावा करत आहे आणि आपल्या देशातील मुसद्दी त्यावर एक शब्द बोलायलाही तयार नाहीत, हा आपल्या देशाचा अपमान आहे, असेही ते म्हणाले.
ट्रम्प आपल्या देशाच्या सुरक्षेबाबत हस्तक्षेप का आणि कशासाठी करत आहेत, अमेरिकेत एलॉन मस्क ट्रम्प यांना जाब विचारत आहेत. मात्र, हिंदुस्थानात हस्तक्षेप करणाऱ्या ट्रम्प यांना आपल्या देशाचे पंतप्रधान जाब विचारत नाही, हे कमजोर पंतप्रधान असल्याचे लक्षण आहे, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला.



























































