
‘कोणवरही आरोप करायचे, त्यांना आयुष्यातून उठवायचे, बदनाम करायचे. त्यानंतर त्यांच्या पक्षात येण्यासाठी तयार झाल्यावर आरोप मागे घ्यायचे, त्यांना गंगास्नान करून पक्षात घेतल्याचा आव आणायचा. एवढी भाजपची नीतीमत्ता खालावली आहे’, अशा कडक शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. विधानभवन परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना अत्यंत स्पष्ट शब्दांत उत्तरे देताना सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.
नाशिकमध्ये भाजपमध्ये येणाऱ्यांना कोणताही अडथळा होऊ नये, म्हणून 15 -20 जणांवर आरोप करण्यात आले होते. आरोप झाल्यामुळे त्यांना आम्ही पक्षातून काढले. आता त्यांच्यावरील आरोप मागे घेत त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. एवढी भाजपची नीतीमत्ता खालावली आहे, हे महाराष्ट्रचे दुर्दैव आहे. भाजपती राजकारणाची पातळी खूप ढासळली आहे. कोणवरही आरोप करायचे, त्यांना आयुष्यातून उठवायचे, बदनाम करायचे. त्यानंतर त्यांच्या पक्षात येण्यासाठी तयार झाल्यावर आरोप मागे घ्यायचे, त्यांना गंगास्नान करून पक्षात घेतल्याचा आव आणायचा, हे खूप गंभीर आणि वाईट आहे. उद्या दाऊदही यांच्या पक्षात यायला तयार झाला तर ते त्याच्यावरील देशद्रोहाचे गुन्हे मागे घेतील. आधी सलीम कुत्ता, इक्बाल मिर्चीशी संबंध असणाऱ्यांवर आरोप केले. त्यानंतर ते भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावरील आरोप धुतले गेले. नवाब मलीक यांच्यावरही तसेच आरोप झाले होते. मात्र, त्यांनादेखील पक्षात घेत स्वच्छ करण्यात आले. या घटनांवरून त्यांना भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करायचा नसून भ्रष्टाचार आरोपमुक्त पक्ष करायचा आहे. एवढ्या खालच्या पातळीवर त्यांचे राजकारण गेले आहे. राज्यातील या घटना गंभीर असून आपल्या भाषणावेळी कोण समोर होते, कोण कुढे होते, हे मुद्दे गौण आहेत, असेही ते म्हणाले.
बाकाचा प्रसंग नसून प्रसंग बाका आहे, हे त्यांना माहिती नाही; उद्धव ठाकरे यांची मिश्कील टोलेबाजी
देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या ऑफरबाबत उद्धव ठाकरे विचारण्यात आले असता हा प्रश्न बाकाचा नसून प्रंसग बाका आहे, हे त्यांना माहिती नाही, अशी मिश्कील टोलेबाजी त्यांनी केली. तसेच राज्यातील राजकारण भाजपने खालच्या पातळीवर नेले आहे, असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांनी जी ऑफर दिली आहे, त्यांना माहिती नाही, प्रसंग विरोधी पक्षाच्या बाकाचा नाही, तर प्रसंग बाका आहे. या गोष्टी खेळीमेळीने झाल्या आहेत, त्या खेळीमेळीनेच घेतल्या पाहिजेत. मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो, हे माझ्या वडिलांचे आणि आजोबांचे कर्तृत्व आहे. सुरुवातील परिस्थिती काय होती, कशी होती, ते सर्वांना माहिती आहे. मात्र, ज्यांना सोन्याच्या चमच्याने भरवले, त्यांनी त्या भरलेल्या ताटाशी प्रतारणा केली आहे, हे जनता विसरू शकणार नाही, असेही ते म्हणाले. मराठी माणसाला त्याच्या हक्काची रोजीरोटी मिळवून देण्याचे काम शिवसेनाप्रमुखांनी केले आहे. ही आयत्या ताटावरची माणसे त्यांची जी प्रतारणा केली, ते ज्या स्वार्थासाठी केले, ते त्यांना लखलाभ होवो, जनता त्यांना चांगलेच ओळखत आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
मी परत येईन, हे मी अंबादास दानवे यांना बोलायला सांगितले कारण परत येणे ही काय एकाचीच मक्तेदारी नाही. अनिल परब, आपण स्वतः आलो. सभागृहात जाणेयेणे सुरू असते. त्यात काही नवीन नाही, असेही ते म्हणाले.