
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची पहिली टर्म आज पूर्ण होत आहे. त्याबाबत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या. अंबादास दानवे यांचे कार्य जनतेच्या लक्षात राहील. त्यांच्यासारख्या माणसांना सत्तेची, पदाची गरज नसते. जनतेप्रती असलेली तळमळ आणि निष्ठा हेच त्यांचे बळ असते, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच अंबादास यांना पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
अंबादास दानवे या सभागृहातील पहिली टर्म पूर्ण करत आहेत. आता अंबादास दानवे यांनी आहे त्याच पक्षातून मी पुन्हा येईन, असे म्हणावे, त्याला एक वेगळे महत्त्व आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपच्या, संघाच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता आपण घेतला याबाबत आपण मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, असेही ते म्हणाले. आपण खुलेपणाने त्यांना धन्यवाद देऊ शकतो. मात्र, ते खुलेपणाने आपल्याला धन्यवाद देऊ शकतात का, त्यांनी आपल्याकडून जे घेतलेत, त्याबाबत ते कसे धन्यवाद देणार, असा टोलाही त्यांनी लगावला.
अंबादास दानवे यांचा आम्हाला अभिमान आहे, तसा तो शिवसेनाप्रमुखांनाही वाटत असणार. आता त्यांची पहिली टर्म पूर्ण होत आहे. आपण किती शिकलो यापेक्षा काय शिकलो आणि त्याचा उपयोग जनमानसासाठी कसा करून घेत आहोत, हे महत्त्वाचे आहे. पदे येतात आणि जातात मात्र जनमानसात आपली प्रतीमा काय राहते, ते आपल्या आयुष्याचे फलीत असते. अनेकजण पद मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी धडपडत असतात. मात्र, अंबादास दानवे सोन्याचा चमचा घेऊन आलेले नाहीत, पण त्यांनी भरलेल्या ताटाशी प्रतारणाही केलेली नाही. त्यासाठी जनता तुम्हाला धन्यवाद देत असेल, असेही ते म्हणाले.
अंबादास यांच्या कल्पकतेचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनीही केला. अंबादास हे कल्पक आहेत. शिवसैनिक असल्यापासून प्रत्येक गोष्ट ते अभिनव पद्धतीने करत असतात. मुख्यमंत्रीपद महत्त्वाचे असतेच, पण विरोधी पक्षनेतेपद हे त्यापेक्षा जास्त जबाबदारीचे पद असते, असे शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला सांगितले होते. विरोधी पक्षनेता आक्रमक असला पाहिजे पण आक्रस्ताळा असता कामा नये, असेही ते म्हणायचे. या सभागृहात अनेक मान्यवरांनी विरोधी पक्षनेतेपद भूषवले आहे. आता त्यात अंबादास दानवे यांचेही नाव जोडले गेले आहे. यावेळी त्यांनी मृणाल गोरे यांच्याबाबतची आठवण सांगत विचारांशी निष्ठा त्यांच्यासारखी असावी, असे सांगितले.
अन्याय किंवा कोणत्याही संकटात अंबादास घटनास्थळी जात माहिती घेत, ती माहिती सभागृहात मांडतात. आम्ही शेतकऱ्यांच्या भेटीसाठी गेलो होतो. त्यावेळी एका महिलेच्या मुलाच्या शाळेत प्रवेशाचा आणि खर्चाचा प्रश्न होता. त्यावेळी अंबादास यांनी पुढाकार घेत त्या मुलाचे अॅडमिशन केले आणि त्याचा शिक्षणाचा खर्च स्वीकारला. अंबादास हे कधीही पदासाठी आपल्याकडे आलेले नाही. त्यांच्यासारख्या व्यक्तींनी पदाची आणि सत्तेची गरज नसते. जनतेप्रती असलेली तळमळ आणि निष्ठा हेच त्यांचे बळ असते, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.