
>> प्रसाद नायगावकर
लोकसभा निवडणूकीचा निकाल येत्या 4 जून (मंगळवारी) जाहीर होणार आहे. सर्वांनाच या निकालाची उत्सुकता लागली आहे. पुसद शहरात निकालापूर्वीच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संजय देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली होती. आता निकालापूर्वीच त्यांच्या समर्थकांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला असून याबाबतचे बॅनर पुसद शहराचा मध्यभाग असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात झळकले आहेत.
पुसद शहराच्या अनेक भागात हे पोस्टर झळकले आहेत . या बॅनर वर “ विजय निश्चित ” अरे कोण म्हणते येत नाही आल्याशिवाय राहत नाही. आणि समोर महाविकास आघाडी…. असे आशय युक्त बॅनर असून बॅनरवर एकीकडे नगर पालिका माजी पाणी सभापती राजू दुधे व माजी मंत्री संजय देशमुख यांचा शुभेच्छा देताना फोटो आहे. दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. या लोकसभा यवतमाळ वाशिम च्या निवडणुकीमध्ये मतमोजणी पूर्वीच संजय देशमुख यांचा विजय जल्लोष सुरु झाला असून महायुतीच्या गोटात अस्वस्थ शांतता आहे.
लोकसभेच्या निवडणूक प्रचारात संजय देशमुख यांनी आघाडी घेत शिस्तबद्ध प्रचार केला होता. मित्र पक्षांच्या नेत्यांशी अगदी व्यवस्थित समन्वय साधून संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला. मोदी सरकारच्या फसव्या घोषणांमुळे शेतकरी आणि खास करून युवा वर्ग कसा फसविल्या गेला हे मतदारांना पटवून देण्यात ते यशस्वी झाले. दुसरीकडे शिंदे गटाच्या भावना गवळी यांचे नाराजी नाट्य रंगले होते. यामुळे यवतमाळ वाशिम लोकसभा उमेदवारीचे महायुतीचे घोंगडे भिजत पडले होते. अगदी शेवटच्या क्षणी राजेश्री पाटील यांची उमेदवारी घोषित झाली. या उमेदवारीवरून संघ परिवार नाराज होता.
या सर्व घटनांमुळे कार्यकर्त्यांना संजय देशमुख यांच्या विजयाबद्दल 100 टक्के खात्री आहे. तर महायुतीच्या कार्यकर्त्यांना विजयाची खात्री नसल्याने त्यांच्या गोटीत अस्वस्थ शांतता आहे. तसेच कमालीची उदासीनताही दिसून येत आहे.
आमच्या कार्यकर्त्यांनी हे पोस्टर लावले आहेत. या कार्यकर्त्यांनी जिवतोडून प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यांचा तळागाळातील मतदारांशी थेट संपर्क होता. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी आणलेल्या योजना आणि त्यांची शेतकऱ्यांसंबंधी आणि युवकांसाठी असलेली तळमळ याच्यामुळे मतदारांनी दिलेला जनादेश हा स्पष्ट आहे. धनशक्तीला मतदारांनी नाकारले हे यावरून स्पष्ट होते.यामुळेच कार्यकर्त्यांनी हे पोस्टर लावले आहे.
संजय देशमुख , उमेदवार, महाविकास आघाडी