समृद्धी टोल नाक्यावर लुटीची धक्कादायक घटना उघड; अजित पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीसांच्या मुलाला लुटले, 82 हजारांची रोकड लांबवली

मेहकरजवळील फरदापूर येथील समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर लुटीची धक्कादायक घटना उघड झाली आहे. अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस गिरीधर ठाकरे यांचा मुलगा प्रमोद ठाकरे याच्याकडून टोल कर्मचाऱ्यांनी तब्बल 82 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना 9 जुलै रोजी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली. प्रमोद ठाकरे हे स्कॉर्पिओने अकोल्याहून मेहकरकडे जात होते. समृद्धी टोल नाक्यावर पोहचताच व्यवस्थापक पवनकुमार आणि अन्य 15 टोल कर्मचाऱ्यांनी त्यांची गाडी अडवली. चारही बाजूंनी घेराव घालून धमकावले आणि त्यांच्या खिशातील 82 हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले, असा आरोप प्रमोद यांनी केला आहे.

घटना घडली त्यावेळी गिरीधर ठाकरे वैद्यकीय कारणांमुळे हैदराबाद येथे होते. मेहकरला आल्यानंतर त्यांनी रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी(रस्ते विकास) यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. याबाबत कोणत्याही अधिकाऱ्याने माहिती दिली नाही, असे ते म्हणाले. या प्रकाराबाबत ठाकरे यांनी पालकमंत्री मकरंद पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, रस्ते विकास महामंडळ व पोलीस ठाणे, मेहकर येथे तक्रार दाखल केली आहे.

समृद्धी टोल नाका लुटमारीचे केंद्र बनले असून यापूर्वीही 4-5 जणांना लुटण्यात आले आहे. टोल वसुलीच्या नावाखाली सामान्य नागरिकांना वेठीस धरले जात आहे, असे ठाकरे म्हणाले. या गंभीर प्रकाराची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, टोल व्यवस्थापक पवनकुमार यांच्यावर कठोर कारवाई करून मेहकर टोल नाक्यावरील कंत्राट त्वरित रद्द करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.