
>> श्रद्धा मोरे
मुलांच्या आरोग्य व शिक्षणाच्या आधारस्तंभ असलेल्या ‘अंगणवाडी सेविका’ एक सशक्त पिढी घडवतात. अंगणवाडी सेविका या खऱ्या अर्थाने मुलांच्या आईच आहेत. सकाळी घराची ओसरी ओलांडून स्वतच्या मुलांना प्रेमाने निरोप देत, ट्रेनच्या गर्दीतले धक्के खात त्या छोटय़ाशा अंगणवाडीत पोचतात.अंगणवाडी सेविका या केवळ कर्मचारी नसून त्या आरोग्य आणि शिक्षणाच्या आधारस्तंभ आहेत. त्यांचे कार्य अत्यंत कठीण आणि महत्त्वपूर्ण असून एक सशक्त आणि निरोगी समाज घडवण्यासाठीचे त्यांचे योगदान अमूल्य आहे.
अंगणवाडीत येताच क्षणी प्रेमाची शिदोरी उघडून मुलांशी बोबडे बोल बोलत स्वतला त्या 3-4 तासांसाठी विसरून जातात. मुलं कितीही खटय़ाळ असली, शेंबडी असली, रडकी असली तरी त्यांच्या हसण्यात त्या स्वतचा आनंद शोधतात, तर कधी मुलं रडली तर आई या नात्यानेच त्यांना जवळ घेऊन प्रसंगी मांडीवर बसवून काळजीपोटी त्यांची तोतऱ्या भाषेत समजूत कायाचा प्रयत्न करतात. रडणाऱ्या त्या लेकरांना कुशीत घेताना अंगणवाडी सेविकेच्या स्पर्शातली माया त्या लहानग्यांना शांत करते. त्यांच्या डोळ्यांतले अश्रू पुसताना नकळत त्या मुलांची या सेविका आई होऊन जातात हे सहसा आपल्या लक्षात येत नाही.
या सेविकांच्या शिकवणीतून खरं तर मुलांना पहिली अक्षर ओळख होऊन ‘अ, आ, इ, ई…’पासून सुरू झालेला मुलांचा प्रवास प्राथमिक ते माध्यमिकपर्यंत पोचतो आणि त्याहून अधिक महत्त्वाचं म्हणजे आपुलकी, जिव्हाळा याची जाणीव त्या मुलांमध्ये निर्माण होऊन त्या शिक्षिकेचा मुलांना लळा लागतो. किती गोड आणि सुंदर नातं तयार होतं हे, जे विश्वासाच्या जोरावर जोडले जाते. मुलांचे खरे बालपण याच वास्तूतून सुरू होते. लाडिकपणे बोलली जाणारी गाणी, मराठी बालगीते, बडबड गीते, ‘जॉनी जॉनी येस पप्पा’, ‘ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार’सारखी इंग्रजी गाणी, सोबत बोबड्या शब्दांची चाल, ठरावीक कवायत प्रकार, रंग, प्राणी व पक्षी यांची ओळख, बोटांवर शिकवली जाणारी अंकांची ओळख फार फार गमतीशीर असते.
निरागस बालपणाची अशी गमतीशीर सुरुवात म्हणजे ही अंगणवाडी आणि त्या अंगणवाडीची पालवी बहरवणारी शोभा म्हणजे अंगणवाडी सेविका/शिक्षिका असे मला वाटते. कधी कधी टीचर कितीही ओरडल्या नि त्यावर मुलं रडायला लागली की, आपसूकच ती मुलं त्याच टीचरची साडी धरून रडत उभी राहतात व क्षणात शांत होतात. अंगणवाडी सेविकेच्या साडीचा स्पर्श बहुधा त्या मुलांना अंतर्मनातून स्वतच्या सुरक्षिततेची जाणीव देत असावा. ही ओळख फक्त एक सेविका किंवा शिक्षिका नसून या मुलांच्या जीवनाला नवीन दिशा देणारी मार्गदर्शिका आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
अंगणवाडी सेविकांमुळेच खरं तर मुलांना शाळेची ओलागते. रडत का होईना, पण मुलांना हळूहळू त्या जागेची ओलागते, मुलं एकमेकांत रुळायला लागतात. शाळेत अभ्यास नाही केला तरी गोड गोड खाऊ, लाडू मिळतो याचे मुलांना विशेष आकर्षण वाटते. त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना ‘माझी पहिली शाळा म्हणजे माझी अंगणवाडी’ हे अगोदर अभिमानाने सांगायला शिकवलं पाहिजे.



























































