शिवामूठ म्हणजे काय? त्याचे महत्त्व काय? कशी करावी भोलेनाथाची आराधना? जाणून घ्या सविस्तर…

>> योगेश जोशी

यंदा श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारपासून होत आहे. तसेच या वर्षी एकूण पाच श्रावणी सोमवार आले आहेत. हा योगायोग तब्बल 71 वर्षांनी जुळून येत आहे. श्रावणी सोमवार म्हणजे शिवभक्तांसाठी पर्वणीच असते. या दिवशी महादेवाच्या मंदिरात आणि ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची रीघ लागते. तर काही तीर्थक्षेत्री श्रावण सोमवारनिमित्त अनुष्ठाने करण्यात येतात. तसेच दिनदर्शिकेत श्रावणी सोमवारी शिवामूठ सिहून त्यापुढे एखादे धान्य लिहिलेले असते. शिवामूठ म्हणजे नेमके काय, त्याबाबतची माहिती आणि महत्त्व जाणून घेऊया.

महादेव भोलेनाथ शंकरांच्या उपासनेसाठी ओळखला जाणारा हा महिना सोमवारपासून सुरू होत असल्याने यंदा श्रावणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. सोमवारपासून श्रावण सुरू होत असल्याने यंदा पाच श्रावणी सोमवार येत आहेत. श्रावणात प्रत्येक सोमवारी महादेवाला मूठभर धान्य वाहण्याची प्रथा आहे. त्यालाच शिवामूठ असे म्हणतात. प्रत्येक श्रावणी सोमवारची वेगवेगळी धान्य असतात. त्याची माहिती दिनदर्शिकेत दिलेली असते.

श्रावण महिना व्रतवैकल्याचा असल्याने अनेकजण श्रावणी सोमवारी उपवास करतात. तसेच महादेवाचे दर्शन घेत बिल्वपत्र आणि दूध अर्पण करण्यासाठी प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहण्याची रीत आहे. त्याला वेगळे महत्त्वही आहे. भगवान शंकराला आशुतोष म्हणतात. म्हणजे कोणतीही गोष्ट भक्तीभावाने अल्प प्रमाणात मनोभावे अर्पण केली तर भोलेनाथ त्याचा स्विकार करून भक्तांवर कृपादृष्टी ठेवतात. त्यामुळे आशुतोष शंकराला फक्त मूठभर धान्य वाहण्यात येत. त्यामुळे याला शिवामूठ असे नाव रुढ झाले आहे. तर अनेक भाविक सोमवारी भोलेनाथाला जलाभिषेकही करतात.

या श्रावण महिन्यात अमरनाथ यात्रा आयोजित होते. फक्त श्रावण महिन्यातच बर्फाचे ज्योतिर्लिंग तयार होते. ते फक्त या महिन्यातच कसे तयार होते त्याबाबतचे गूढ अजूनही कायम आहे. त्यामुळे या महिन्यात बर्फानी बाबा म्हणजे अमरनाथची यात्रा होते. तसेच द्वादश ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वरमध्ये ब्रह्मा, विष्णू, शंकर या त्रिदेवांचा वास असल्याची मान्यता आहे. त्यामुळे श्रावणी सोमवारी ब्रह्मगिरी पर्वत, गंगाद्वार आणि त्र्यंबकेश्वर अशा प्रदक्षिणाही काही भाविक करतात.

कोणतीही गोष्ट दिल्याने कमी होत नाही, तर त्यात वाढ होते. ते ज्ञान आणि अन्न यासाठी लागू आहे. आपल्या संस्कृतीत ज्ञानदान आणि अन्नदान याला विशेष महत्त्व आहे. त्यातूनच शिवामूठ ही संकल्पना आल्याचे सांगण्यात येते. गरजूंना मूठभर धान्य तरी द्यावे, ही शिकवणच या शिवामूठमधून मिळते. आपल्या संस्कृतीत अनेक गोष्टी प्रतिकात्मक आणि बोधरूपाने सांगण्यात आल्या आहेत. त्याला अनुसरुच या प्रथा रुढ झाल्या आहेत. सगळ्यांचे सुख, हित यांचा विचार करणारी आपली संस्कृती आहे. त्यामुळे आधुनिक काळात जुन्या प्रथा परंपरा यांचा अनादर न करता त्याच्यामागील विचार आणि प्रतिक जाणून घेण्याचा प्रयत्न करत ही शिकवण पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे.

यंदाच्या श्रावणी सोमवारच्या शिवामूठ

पहिला श्रावणी सोमवार 5 ऑगस्ट : तांदूळ
दुसरा श्रावणी सोमवार 12 ऑगस्ट : तीळ
तिसरा श्रावणी सोमवार 19 ऑगस्ट : मूग
चौथा श्रावणी सोमवार 26 ऑगस्ट : जव
पाचवा श्रावणी सोमवार 2 सप्टेंबर : सातू