श्रेयसला वगळल्याने वडिलांचा राग अनावर

आशिया कपसाठी जाहीर झालेल्या हिंदुस्थानच्या संघातून श्रेयस अय्यरला वगळल्यामुळे त्याचे वडील संतोष अय्यर चांगलेच संतापले आहेत. आयपीएलसह सर्वच स्पर्धांमध्ये धडाकेबाज कामगिरी करूनही श्रेयसला 15 जणांच्या मुख्य संघात तर सोडाच, पाच जणांच्या राखीव यादीतही न घेतल्यामुळे अवघ्या हिंदुस्थानात क्रिकेटप्रेमींनी बीसीसीआय आणि निवड समितीवर टीकास्त्र सोडले आहे.

श्रेयसने कोलकाता नाइट रायडर्सला 2024 मध्ये आयपीएल विजेतेपद मिळवून दिले, तर यंदा पंजाब किंग्जला अंतिम फेरीत नेले. वर्षानुवर्षे स्थिर कामगिरी करूनही श्रेयसला वगळणे म्हणजे निवड समितीच्या डोक्यात काय शिजतेय, असा प्रश्न वडिलांनी उपस्थित केला.

श्रेयसने अजून काय करायचंय? दिल्ली कॅपिटल्सपासून केकेआर, पंजाब किंग्जपर्यंत तो सातत्याने खेळतोय. तो हिंदुस्थानचा कर्णधार होईल अशी अपेक्षा नव्हती, पण किमान संघात तरी असायला हवा होता. त्याच्या कामगिरीकडे डोळेझाक करणं अन्यायकारक आहे, असा घणाघातसी संतोष अय्यर यांनी केला.