
हिंदुस्थानी अंतराळवीर शुभांशू शुक्ला या महिन्याच्या अखेरीस प्रक्षेपित होणाऱया ‘ऑक्सिओम मिशन 4’ मधून अंतराळात जाणार आहेत. ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएसएस) 14 दिवस राहणार आहेत. या मोहिमेत त्यांना विविध प्रकारचे भात, मूगडाळ हलवा आणि आमरसाचा आस्वाद घेता येणार आहे. तशी व्यवस्था इस्रो आणि डीआरडीओने केली आहे.
‘‘शुक्लाजींना ‘घरका खाना’ मिळेल आणि नासाने मंजूर केलेल्या आंतरराष्ट्रीय पाकपृतीतून निवड करण्याचा पर्यायदेखील असेल,’’ असे इस्रोच्या ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटरचे संचालक डीके सिंह म्हणाले. इस्रो आणि डीआरडीओने गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांसाठी खाद्यपदार्थ विकसित केले आहेत व नासाच्या मान्यतेने ते शुक्ला यांना उपलब्ध करून दिले जात आहेत, असे ते म्हणाले. गेल्या महिन्यात ऑक्सिओम स्पेसने ऑक्सिओम मिशन 4 चे क्रू मेंबर्स आयएसएसमध्ये उपलब्ध असलेल्या अनेक अन्न पर्यायांचे नमुने घेतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. व्हिडीओमध्ये शुक्ला विविध पदार्थांचे नमुने घेताना दिसत आहेत. प्रत्येक पदार्थाची चव आणि पसंतीनुसार रेटिंग दिली जात आहे. हे जेवण नंतर पॅक केले जाईल आणि ऑक्सिओम मिशन 4 च्या अंतराळवीरांसाठी मोहिमेदरम्यान खाण्यासाठी अंतराळ स्थानकात पाठवले जाईल.