बर्मिंगहॅम कसोटीवर हिंदुस्थानची पकड! गिलचे शतकी तुफान; राहुल, पंत, जडेजा यांची अर्धशतके

हिंदुस्थानने इंग्लंडपुढे विजयासाठी पाचशेपार आव्हान उभे करून बर्मिंगहॅममधील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यावर मजबूत पकड मिळविली आहे. पहिल्या डावात द्विशतकी खेळी करणाऱ्या कर्णधार शुभमन गिलने दुसऱ्या डावातही शतकी खेळी करून अनेक विक्रमांना गवसणी घातली. याचबरोबर लोकेश राहुल (55), ऋषभ पंत (65) व रवींद्र जडेजा यांनी अर्धशतके झळकावित इंग्लिश गोलंदाजी निष्प्रभ ठरविली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा हिंदुस्थानने 77 षटकांत 4 बाद 369 धावसंख्येपर्यंत मजल मारत आपली आघाडी साडेपाचशे पार नेली होती. शुभमन गिल 142, तर रवींद्र जडेजा 58 धावांवर खेळत होते.

हिंदुस्थानने 587 धावसंख्या उभारल्यानंतर इंग्लंडला 407 धावांवर रोखून पहिल्या डावात 180 धावांची आघाडी मिळविली होती. मग हिंदुस्थानने तिसऱ्या दिवसाच्या 1 बाद 61 धावसंख्येवरून शनिवारी पुढे खेळायला सुरुवात केली. करुण नायर 26 धावांवर बाद झाल्यानंतर के. एल. राहुलने 84 चेंडूंत 10 चौकारांसह 55 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर शुभमन गिल व ऋषभ पंत ही जोडी जमली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी (103 चेंडूंत 110 धावा) शतकी भागीदारी केली. पंतने 58 चेंडूंत 65 धावा करताना 8 चौकारांसह 3 षटकार ठोकले. शोएब बशीरला मैदानाबाहेर भिरकाविण्याच्या नादात त्याच्या हातातून बॅट निसटली अन् डकेटकरवी तो झेलबाद झाला. त्यानंतर रवींद्र जडेजानेही अर्धशतक ठोकून गिलला साथ दिल्याने हिंदुस्थानने इंग्लंडपुढे साडेपाचशेहून अधिक धावांचे आव्हान उभे करण्यात यश मिळविले. इंग्लंडकडून जोस टंगने 2, तर ब्रायडन कार्से व शोएब बशीर यांना 1-1 बळी मिळाला.