आता वन डेचा वर्ल्ड कप जिंकायचाय! कर्णधार गिलचे एकच लक्ष्य 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिकेटमध्ये काही पराभव असे असतात की, ते स्कोअरबोर्डवर संपत नाहीत. ते मनात कायम जिवंत राहतात. 2023 आयसीसी वर्ल्ड कपमध्ये अहमदाबादला अंतिम सामन्यात झालेला पराभव हिंदुस्थानी क्रिकेटच्या स्मरणातून अजूनही पुसला गेलेला नाही. म्हणूनच हिंदुस्थानचा एकदिवसीय कर्णधार शुभमन गिल आता आयसीसी वर्ल्ड कप जिंकायचाय. तेच एकमेव लक्ष्य डोळय़ांपुढे असल्याचे त्याने सांगितले.

हिंदुस्थानने 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये सलग विजयांची मालिका रचत अंतिम फेरी गाठली होती. संघ अपराजित होता; पण अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने अहमदाबादच्या मैदानावर तो विजयी रथ अडवला आणि हिंदुस्थानच्या हातातून जगज्जेतेपदाचा मुकुट हिसकावून घेतला. त्या पराभवाच्या जखमा आजही खोलवर रुतल्या आहेत. मात्र त्या जखमेवर आता जगज्जेतेपदाचे औषध लावण्याची वेळ आली आहे. पुढील वर्षी दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणाऱया 50 षटकांच्या आयसीसी वर्ल्ड कपवर गिलने नजर रोखली आहे.

बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात गिल म्हणाला, मागच्या वेळी आम्ही जगज्जेतेपदाच्या खूप जवळ होतो. आता पुन्हा संधी मिळणार आहे. कोणत्याही स्वरूपात वर्ल्ड कप जिंकणे हेच देशासाठी सर्वोच्च ध्येय आहे. दरम्यान, टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादवनेही हिंदुस्थानी क्रिकेटची भूक अजून वाढल्याचे सांगितले. 2024 च्या टी-20 विश्वचषकानंतर पुरुष संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, तर महिला संघानेही पहिला एकदिवसीय विश्वचषक उचलला. ज्युनियर मुलींनी आणि मुलांनीही एकेका वर्ल्ड कपला गवसणी घातली.

एकदा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची चव लागली की मागे वळून पाहण्याचा प्रश्नच राहत नाही. आता शक्य तितक्या ट्रॉफी जिंकण्याची भूक वाढली आहे. या ध्येयानंतर अहमदाबादची जखम कुणीही विसरणार नाही हे निश्चित आहे. आणि त्या जखमेला जगज्जेतेपद संपादणे हेच एकमेव औषध असल्याचे सर्वांचे मत आहे. त्यामुळे हिंदुस्थानी संघ नोव्हेंबर 2027 ला जोहान्सबर्गला खेळल्या जाणाऱया अंतिम फेरीसाठी आतापासूनच तयारीला लागलाय.