निवडणूक आचारसंहिता लागल्यापासून…राज्यात चपटी, फुगे, खंबे रिचवण्याआधीच जप्त; 27 कोटी 81 लाखांचा दारू साठा हस्तगत

>>  आशीष बनसोडे

स्थानिक स्वराज्य संस्था व नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसांपर्यंत राज्यात उत्पादन शुल्क विभागाने जोरदार कारवाई केली. मतदारांना खूश करण्यासाठी आणण्यात आलेला तसेच बेकायदेशीर होणारी  तस्करी पकडून तब्बल 27 कोटी 81 लाख रुपये किमतीचा दारू साठा पकडण्यात आला. त्यात गावठी दारूचे प्रमाण सर्वाधिक आहे.

4 नोव्हेंबरपासून राज्यात निवडणूक आचार संहिता लागू झाली. तेव्हापासूनच मतदारांना खूश करण्याचे सर्व प्रयत्न होऊ लागले. चिकन-मटणाच्या पाटर्य़ा, घसा ओला करण्यासाठी चपटी, खंब्याचे वाटप आणि जोडीला लक्ष्मी दर्शन ठिकठिकाणी सुरू होते. त्यामुळे याची आधीच दखल घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यात दारूची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी तगडी फिल्डिंग लावली होती. 4 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत विविध प्रकारची मिळून लाखो लिटर दारू जप्त करण्यात आली. त्यात गावठी दारू एक नंबरवर असून अन्य राज्यातील विदेशी मद्य आणि देशी दारू दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याशिवाय या प्रकरणात 6,759 गुन्हे दाखल करून 6,413 आरोपींना अटक केली. शिवाय दारू तस्करी करणारे 654 वाहने जप्त करण्यात आली.

देशी दारू- 40962 लिटर, गावठी दारू- 138110 लिटर, बियर- 2112 लिटर, वाईन- 1280 लिटर, ताडी- 22377 लिटर, महाराष्ट्रातील विदेशी मद्य- 6291 लिटर, अन्य राज्यांतील विदेशी मद्य- 53241 लिटर. तसेच एकूण गुन्हे- 6759, अटक आरोपी- 6413, जप्त वाहने- 654, मुद्देमाल किंमत- 27.81 कोटी.

 राज्यात आमचे स्पेशल ड्राईव्ह सातत्याने सुरू आहेत. निवडणूक आचार संहिता लागू झाल्यापासून आम्ही आणखी धडक कारवाया सुरू केल्या. यापुढेही त्या सुरू राहतील

प्रसाद सुर्वे, अतिरिक्त आयुक्त (उत्पादन शुल्क)