Sindhudurg News – कुणकेश्वरच्या खोल समुद्रात धक्कादायक प्रकार, किरकोळ वादातून खलाश्याने केला सहकाऱ्याचा खून

खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या नौकेवरील खलाशाने आपापसात झालेल्या वादातून एकाचा खून केला आहे. तसेच आरोपीने नौका पेटवून देत नौकेतून उडी मारल्याची घटना कुणकेश्वर पासून खोल समुद्रात घडली. या दुर्घटनेत बोटीचे सुमारे अडीच कोटींचे नुकसान झाले आहे.

आरोपीचे नाव जयप्रकाश विश्वकर्मा असून तो छत्तीसगडचा रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी येथील राजीवाडा भागातील रफिक फणसोपकर यांच्या मालकीची मुजत रबिया ही नौका दुपारी 12.30 च्या सुमारास मासेमारी करता गेली होती. कुणकेश्वर येथे खोल समुद्रात मासेमारी करताना खलाशी विश्वकर्मा आणि तांडेल यांच्यामध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि विश्वकर्मा यांने तांडेल रवींद्र नाटेकर यांचा खून केला आणि नौका पेटवून दिली. सदर घटना घडताच आरोपी विश्वकर्मा याने समुद्रात उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

नौकेने पेट घेतल्याचे नजीकच्या नौकांना समजतात त्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा आणि नौकेवरील खलाशांना वाचवण्याचा प्रयत्न केला. तसेच तत्काळ याबाबतची माहिती मत्स्य व्यवसाय अधिकारी पोलीस प्रशासन यांना देण्यात आली. प्रशासनाने वेगाने हालचाल करत संशयित आरोपीला ताब्यात घेऊन देवगड बंदरात आणले.

घटनास्थळी देवगड पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सागर सुरक्षा दलाचे उपपोलीस निरीक्षक गणपत दरवेस, पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव, सहाय्यक उप पोलीस निरीक्षक फकरुद्दीन आगा, पोलीस हवालदार आशिष कदम, पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील, स्वप्निल ठोंबरे, महिला पोलीस नाईक प्राची धोपटे, प्राजक्ता कविटकर, सर्वेश नाटेकर, निवासी नायब तहसीलदार विवेक शेठ, संजय गांधी, नायक तहसीलदार सुरेंद्र कांबळे, मंडळ निरीक्षक पावस्कर प्रदीप कदम, मत्स्य परवाना अधिकारी पार्थ तावडे यांनी देवगड बंदर जेटी येथे येऊन घटनेची माहिती घेतली.