
जानवली कृष्णनगरी येथील दत्त मंदिरातील चोरीच्या घटनेत हस्तगत झालेली श्री दत्ताची मूर्ती ही मंदिराच्या स्वयंभू दत्त मंदिर ट्रस्टच्या ताब्यात देण्यात यावी, असा महत्वपूर्ण निर्णय कणकवली न्यायालयाने दिला आहे. जमिनीतील खोदाईदरम्यान मिळालेल्या या मूर्तीवर शासनाचा अधिकार असल्याने ती मूर्ती शासनाच्या ताब्यात देण्यात यावी, असा दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक यांच्यावतीने कणकवली न्यायालयात करण्यात आला होता. मात्र, ही मूर्ती ट्रस्टच्या मंदिरातून चोरीस गेली असल्याने ती मूर्ती पुन्हा ट्रस्टच्याच ताब्यात देण्यात यावी, असा निर्णय दिला आहे. ट्रस्टच्यावतीने देवगड येथील अॅड. सिद्धेश माणगांवकर व अॅड. श्रुती माणगांवकर यांनी काम पाहिले.
जानवली कृष्णनगरी येथील ओंकार मधुकर मोहिते यांच्या स्वमालकीच्या घरासमोरील जागेत २०१८ साली खोदाईदरम्यान १ फूट उंचीची पिवळसर धातूची श्री दत्त मूर्ती सापडली होती. मोहिते कुटुंबाने आपल्या घरासमोरील अंगणात एक छोटे मंदिर उभारून १२ एप्रिल २०१९ रोजी त्या मंदिरात श्री दत्त मूर्तीची स्थापना केली. तसेच ‘श्री स्वयंभू दत्त सेवा चॅरिटेबल ट्रस्ट, जानवली, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग’ या नावाने ट्रस्ट स्थापन करून या मंदिराची ४ जानेवारी २०२४ रोजी सहाय्यक धर्मादाय आयुक्त, सिंधुदुर्ग यांच्याकडे त्यांनी रजिस्टर नोंदणी केली आहे. ५ जुलै २०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास या मंदिरातील श्री दत्त मूर्ती अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. याबाबतची फिर्याद ओंकार मोहिते यांनी कणकवली पोलीस स्थानकात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. चोरीच्या घटनेनंतर काही दिवसांनी संशयितांनी ती मूर्ती पुन्हा मंदिरासमोर आणून ठेवली होती. त्यानंतर ही मूर्ती पोलिसांच्या ताब्यात होती. त्यामुळे ही मूर्ती पुन्हा मंदिर ट्रस्टच्या ताब्यात देण्यात यावी, असा अर्ज स्वयंभू दत्तमंदिर ट्रस्टच्या अध्यक्षा मिनाक्षी मधुकर मोहिते यांच्यावतीने अॅड. सिद्धेश माणगांवकर व अॅड. श्रुती माणगांवकर यांनी कणकवली न्यायालयात दाखल करून युक्तिवाद केला होता.
दरम्यान, या मूर्तीबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक यांच्यावतीने कणकवली न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. ही मूर्ती फिर्यादी मोहिते अथवा मंदिर ट्रस्ट यांना पुन्हा देण्यात येऊ नये. या मूर्तीच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवली जात असून ट्रस्टच्या माध्यमातून पैसे उकळले जात आहेत. ही मूर्ती जमीन खोदकामादरम्यान मिळाली असल्याने त्या मूर्तीवर शासनाचा अधिकार आहे. मूर्तीवर मोहिते अथवा ट्रस्टच्या अधिकार नाही, असा दावा करण्यात आला होता. फिर्यादीच्यावतीने तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक यांच्यावतीने करण्यात या दोन्ही अर्जावर संयुक्त सुनावणी करताना कणकवली न्यायालयाने सदर मूर्ती मोहिते यांच्या ट्रस्टच्या ताब्यात देण्यात यावी, असा महत्वपूर्ण निर्णय दिला.































































