
आपल्या आक्रमक फलंदाजीने जे गेली पाच दशके जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या गळय़ातले ताईत आहेत ते वेस्ट इंडीजचे महान फलंदाज विवियन रिचर्ड्स हिंदुस्थानी क्रिकेटपटूंच्या प्रेमात आहेत. हिंदुस्थान विद्यमान कर्णधार शुभमन गिल माझा आवडता खेळाडू आहे. तो अप्रतिम फलंदाज आहे, पण विराट कोहलीचा खेळ मनमोहक असल्याचे रिचर्ड्स यांनी ठासून सांगितले.
सध्या हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी विवियन रिचर्ड्स यांनी दिल्ली गाठलीय. या दौऱ्यामुळे त्यांना जुन्या आठवणींनी अक्षरशः भारावून टाकलेयं. ‘हिंदुस्थानात पुनः पुन्हा येणं मला खूप आवडतं. दिल्ली माझ्यासाठी खास आहे. इथेच मी माझा पहिला कसोटी सामना खेळलो होतो. त्यामुळे दिल्लीशी माझं भावनिक नातं आहे,’ असेही त्यांनी सांगितलं.
विंडीज खेळाडूंवर विश्वास
पहिल्या कसोटीतल्या पराभवानंतरही रिचर्ड्स आपल्या संघावर विश्वास ठेवत आहेत. ते म्हणाले, ‘आम्हाला अपेक्षा आहे की, विंडीज संघ चांगलं प्रदर्शन करेल, अधिक स्पर्धात्मक क्रिकेट खेळेल. तोपर्यंत गोष्टी सुधारतील. हिंदुस्थानने पहिला सामना जिंकला तरीही माझ्या खेळाडूंवर मला विश्वास आहे.’
गिलवर मोहित, कोहलीचा चाहता
नव्याने कसोटी कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या शुभमन गिलविषयी बोलताना रिचर्ड्स म्हणाले, ‘गिल माझा आवडता खेळाडू आहे. त्याच्यात मोठा खेळाडू होण्याची सर्व लक्षणं आहेत. तो अप्रतिम फलंदाज आहे.’
कोहलीबाबत ते म्हणाले, ‘मी कोहलीच्या खेळण्याच्या शैलीचा कायमच चाहता आहे. त्याची बॅटिंग पाहताना एक वेगळीच ऊर्जा जाणवते.