
बीडमधील खासगी कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी चौकशीसाठी वरिष्ठ आयपीएस महिला अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. बीडच्या कोचिंग क्लासमध्ये विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन नराधमांकडून एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण झाल्याची घटना घडली होती.
दोघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या चौकशीसाठी दोनच दिवसांची पोलीस कोठडी का मागितली गेली, त्यांच्यावर पुणाचा वरदहस्त आहे का, या आरोपींनी आणखी किती मुलींसोबत हे कृत्य केले याबद्दलची माहिती पुढे यायला हवी. त्यामुळे या प्रकरणाची वरिष्ठ महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमून चौकशी करणार का, असा प्रश्न आमदार चेतन तुपे यांनी उपस्थित केला होता.