
शबरीमाला मंदिरातील सोन्या चोरी प्रकरणाबाबत विशेष तपास पथकाने (SIT) न्यायालयात मोठा खुलासा केला आहे. मंदिरातील केवळ दोन कलाकृतींवरचे सोने गायब नसून इतर शिल्पांवरीलही सोन्याचा थर गायब असल्याचे समोर आले आहे.
केरळ हायकोर्टाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या तपासात, द्वारपाल मूर्ती आणि गर्भगृहाच्या दरवाज्यावरील सोने गायब प्रकरणी दोन गुन्हे नोंदवण्यात आले होते. मात्र कोल्लम येथील विजिलन्स कोर्टात सादर केलेल्या अहवालात SIT ने म्हटले आहे की हा घोटाळा केवळ दोन कलाकृतींपुरता मर्यादित नाही. मंदिराच्या प्रभामंडलातील सात तांब्याच्या फलकांवरूनही सोन्याचा थर गायब झाल्याचे उघड झाले आहे. हे फलक शिव आणि व्याळी रूप असलेल्या मूर्तींवर बसवलेले होते.
यापूर्वी फक्त द्वारपाल मूर्तींवरील सोन्याचा आवरण गायब असल्याचे मानले जात होते, परंतु आता सात अतिरिक्त पॅनेलवरूनही सोन्याचा थर काढण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अहवालानुसार, चेन्नई येथील ‘स्मार्ट क्रिएशन्स’मध्ये रासायनिक प्रक्रिया करून तांब्याच्या पत्र्यांवरील सोने वेगळे करण्यात आले आणि सध्या ते बेल्लारी येथील ज्वेलर गोवर्धन रोड्डम यांच्या ताब्यात असल्याचा SIT चा दावा आहे.
या प्रकरणात अटक केलेल्या दहा जणांपैकी स्वयंघोषित प्रायोजक उन्नीकृष्णन पोट्टी, ज्वेलर गोवर्धन रोड्डम आणि स्मार्ट क्रिएशन्सचे पंकज भंडारी यांची कोठडी घेण्याची मागणी SIT ने केली आहे. आतापर्यंत तीन CPI(M) नेत्यांसह दहा जणांना अटक करण्यात आली असून माजी आमदार ए. पद्मकुमार यांचा यात समावेश आहे. तसेच 2019 मध्ये देवस्वम खात्याचे मंत्री असलेले माजी मंत्री कडकंपल्ली सुरेंद्रन यांच्याही चौकशी करण्यात आली आहे.
SIT ने न्यायालयाला कळवले की सोन्याचा थर किती प्रमाणात चढवण्यात आला होता हे समजण्यासाठी त्यांनी इस्रोच्या तिरुवनंतपुरम येथील VSSC केंद्राची तांत्रिक मदत मागितली आहे. येथील शास्त्रज्ञ सोन्याने मढवलेल्या तांब्याच्या पत्र्यांचे नमुने गोळा करणार आहेत.
शबरीमाला सोन्याचा घोटाळा ऑक्टोबर 2025 मध्ये प्रकाशात आला होता, जेव्हा केरळ हायकोर्टाने मंदिरातील मौल्यवान वस्तू आणि सोन्याशी संबंधित अनियमिततेची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने माजी न्यायमूर्ती के. टी. शंकरण यांच्याकडे मंदिरातील वस्तूंची यादी तयार करण्याची जबाबदारी सोपवली होती. प्राथमिक अहवालात गर्भगृहातील द्वारपाल मूर्तींवरील सोन्याचा आवरण न्यायालयाला न कळवता काढून टाकल्याचे नमूद करण्यात आले होते. या घोटाळ्यामुळे सत्ताधारी CPI(M) वर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


























































