मोनो मार्गावर लवकरच सहा नव्या गाड्या, तांत्रिक बिघाडाच्या त्रासातून प्रवाशांची सुटका होणार

mumbai-monorail-001

दक्षिण मुंबईतील संत गाडगे महाराज चौक (सात रस्ता) ते पूर्व उपनगरातील चेंबूरला जोडणाऱ्या मोनोरेलच्या ताफ्यात लवकरच नवीन सहा गाड्यांची भर पडणार आहे. सध्या या मार्गावर धावणाऱ्या जुन्या गाड्यांमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असून फेऱ्या रद्द होण्याचे प्रमाण अधिक आहे. नव्या गाड्या आल्यानंतर मोनोच्या फेऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे नियमित प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सोमवारी मोनोरेलच्या चेंबूर स्थानकातून सुटलेल्या गाडीमध्ये तांत्रिक बिघाड होऊन गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले व प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यावर प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्यानंतर नवीन सहा गाड्या मोनोच्या सेवेत लवकर दाखल करण्याच्या कार्यवाहीला गती देण्यात आली आहे.

‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत तेलंगणा येथील मेधा सर्वो ड्राइव्हसने मलेशिया येथील एसएमएच रेलशी 40 गाड्यांसाठी 700 कोटी रुपयांचा करार केला होता. त्या करारानुसार नवीन चार डब्यांच्या गाड्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. नवीन गाड्या तांत्रिकदृष्ट्या चांगल्या असून सध्या वारंवार विस्कळीत होणाया प्रवासाचा दर्जा सुधारेल. नव्या सहा गाड्या सेवेत दाखल झाल्यास दर पाच मिनिटांनी मोनोरेलची फेरी चालवता येईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सद्यस्थितीत या मार्गावरील प्रवाशांना साधारण 20 मिनिटे प्रतीक्षा करावी लागत आहे.