ऐकावं ते नवलच! नैरोबीत हिंदुस्थानी वंशाच्या 10 लाख कावळय़ांची कत्तल

कावळय़ांच्या वाढत्या संख्येमुळे हैराण झालेल्या केनिया सरकारने आता या वर्षअखेरपर्यंत तब्बल दहा लाख कावळय़ांची कत्तल करण्याचे फर्मान सोडले आहे. हिंदुस्थानी वंशाचे हे कावळे 1940 मध्ये आफ्रिकेत आले, तेव्हापासून या कावळय़ांची संख्या झपाटय़ाने वाढतेय. कावळे आक्रमक झाले असून त्यांनी इतर पक्षी आणि नागरिकांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे केनियातील पर्यटन आणि हॉटेल इंडस्ट्रीजचे मोठे नुकसान होत असल्याचे केनिया सरकारचे म्हणणे आहे.

केनियातील पक्षीतज्ञ कॉलिन जॅक्सन यांच्या म्हणण्यानुसार, हिंदुस्थानी वंशाच्या कावळय़ांमुळे केनियातील इतर पक्ष्यांची संख्या झपाटय़ाने कमी होत आहे. हे कावळे किनारपट्टीवरील इतर लहान पक्ष्यांना त्रास देतात, इतर पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त करतात. यासोबतच ते इतर पक्ष्यांची अंडी आणि पिले खात आहेत. कमी होणाऱया इतर पक्ष्यांमुळे पर्यावरणाचा ऱहास होत असून कीटकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत.

कावळय़ांमुळे अर्थव्यवस्था ढासळली
कावळय़ांची वाढती संख्या केनियातील पर्यटन आणि हॉटेल इंडस्ट्रीसाठी त्रासदायक ठरतेय. समुद्रकिनाऱयालगत असलेल्या हॉटेलमध्ये कावळे पर्यटकांना अधिक त्रास देतात. पर्यटकांना खाद्यपदार्थ खात असतानाही ते त्रास देतात. त्यामुळे येथील पर्यटन कमी होत चालले असून केनियाच्या अर्थव्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम होत असल्याचे केनिया सरकारचे म्हणणे आहे.