‘स्लीपिंग प्रिन्स’ची 20 वर्षांची झुंज संपली; सौदीचा राजपुत्र अल-वलीदचे निधन

जगभरात ‘स्लीपिंग प्रिन्स’ या नावाने प्रसिद्ध असलेले सौदी राजघराण्याचे प्रिन्स अल-वलीद बिन खालिद बिन तलाल अल सौद यांचे निधन झाले. गेल्या 20 वर्षांपासून ते कोमात होते.

अल-वलीद यांचा जन्म एप्रिल 1990 मध्ये झाला होता. ते प्रिन्स खालिद बिन तलाल यांचे मोठे पुत्र होते आणि प्रसिद्ध अरब अब्जाधीश उद्योगपती प्रिन्स अल-वलीद बिन तलाल यांचे पुतणेदेखील होते. 2005 मध्ये वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले. लंडनमध्ये लष्करी पॅडेट प्रशिक्षण घेत असताना त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि अंतर्गत रक्तस्राव झाला. या अपघातामुळे ते कोमात गेले आणि त्यानंतर कधीही शुद्धीवर आले नाहीत.

वडिलांचा अतूट विश्वास

प्रिन्स अल-वलीद यांच्यावर शक्य तितके सर्वोत्तम उपचार देण्यासाठी डॉक्टर मंडळींनी अमेरिका आणि स्पेनमधून विशेष पथके बोलावली, पण वैद्यकीय शास्त्राच्या मर्यादा असूनही त्यांचे वडील प्रिन्स खालिद यांनी मात्र आपल्या मुलाचा ‘लाईफ सपोर्ट’ काढण्यास ठामपणे नकार दिला. पण त्यांनी मुलाचे उपचार थांबवले नाहीत आणि प्रार्थना करणे कधीही सोडले नाही. दररोज ते आपल्या मुलाजवळ बसायचे, कुराण वाचायचे. कधी मुलाच्या बोटांच्या किंचित हालचाली पाहून त्यांना आशा वाटायची की, मुलगा एक दिवस नक्कीच बरा होईल.