
हिंदुस्थानची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडत इतिहास रचला आहे. दसहजारी मनसबदारांच्या पंगतीत बसणारी ती जगातील चौथी महिला फलंदाज ठरली असून, हिंदुस्थानकडून हा मान मिळवणारी मिताली राजनंतरची दुसरी खेळाडू ठरली आहे. मिताली राज 10,868 धावांसह या यादीत आघाडीवर आहे. न्यूझीलंडची सुझी बेट्स (10,652) आणि इंग्लंडची शार्लट एडवर्ड्स (10,273) या मानधनापुढे आहेत.
मराठमोळय़ा स्मृती मानधनाने हा टप्पा सर्वात कमी डावांत गाठला. सर्व फॉरमॅट मिळून तिने 281 डावांत 10 हजार धावांचा पल्ला गाठला. मिताली राजला हा टप्पा गाठण्यासाठी 291 डाव लागले, तर शार्लट एडवर्ड्स आणि सुझी बेट्स यांनी अनुक्रमे 308 आणि 314 डावांत हा विक्रम केला होता.
रविवारी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी स्मृती मानधना 10 हजार धावांपासून 27 धावा दूर होती. डावखुरी फिरकीपटू निमाशा मिपागेच्या गोलंदाजीवर लाँग ऑनकडे एक धाव घेत तिने 10 हजार धावांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला. हा मैलाचा दगड हिंदुस्थानच्या उपकर्णधारासाठी अत्यंत यशस्वी ठरलेल्या वर्षावर शिक्कामोर्तब करणारा ठरला आहे.


























































