
>> प्रसाद ताम्हनकर
‘टीम फ्रिडे’ हे नाव सध्या विज्ञान विश्वात एका अनोख्या कारणाने गाजत आहे. संशोधकांच्या एका गटाने टीम फ्रिडे या अमेरिकन रहिवाशाच्या रक्तापासून अँटी वेनम (विषरोधक/सापाच्या विषावरील) औषध तयार केल्याचा दावा केला आहे. पूर्वी ट्रक मेकॅनिक असलेल्या टीम फ्रेडीला त्याच्या चुकीमुळे दोनदा कोब्रा हा साप चावला. त्यामुळे टीम कोमात गेला. सापाच्या विषामुळे आपला मृत्यू होईल किंवा एखादे बोट कापावे लागेल अशी त्याला सतत भीती वाटत होती. मात्र तो बचावला आणि मग संपूर्ण जगासाठी अत्यंत खात्रीचे असे अँटी वेनम बनवण्याच्या ध्येयाने त्याला झपाटले. टीमने गेल्या 20 वर्षांत जवळपास सातशे वेळा क्रेट, कोब्रा, मांबा, ताइपन अशा अत्यंत विषारी सापांचे स्वतःला विष टोचून घेतले. या कालावधीत त्याच्या रक्ताला सापाचे विष निक्रिय करण्याची क्षमता प्राप्त झाली. त्याच्या शरीरात तयार झालेल्या या अँटीबॉडीजपासून आता संशोधक खास प्रकारचे अँटी वेनम बनवणार आहेत.
जगभरात दरवर्षी 1 लाख 40 हजार लोक सर्पदंशाने मृत्यू पावतात. 5 लाख लोकांना सर्पदंशाच्या प्रभावाने एकतर कायमचे अपंगत्व येते किंवा त्यांच्या शरीराचा एखादा अवयव कापावा लागतो. टीमच्या रक्ताने प्रभावी औषध तयार करण्यात यश मिळाल्यास संपूर्ण जगाला, त्यातील अतिदुर्गम भागातील लोकांना त्याचा खूप फायदा होणार आहे. सध्या उपलब्ध असणारे अँटी वेनम हे फक्त काही विशिष्ट जातीच्या सर्पांच्या दंशावर उपयोगी पडते. मात्र टीमच्या मदतीने तयार होणारे औषध सर्व जातींच्या सापांच्या दंशावर प्रभावी ठरणार आहे. जगातल्या प्रत्येक भागातील लोकांना याचा फायदा व्हावा हे माझे ध्येय आहे असे टीम म्हणतो.
सध्या घोडय़ासारख्या प्राण्यांमध्ये लहान प्रमाणात सापाचे विष टोचून अँटी वेनम बनवण्यात येते. हे विष टोचल्यावर या प्राण्याची प्रतिकारशक्ती त्यांच्या रक्तात या विषासोबत लढणारी अँटीबॉडीज तयार करते. या अँटीबॉडीज साठवल्या जातात आणि नंतर उपचारासाठी वापरण्यात येतात. मात्र या औषधाचा वापर करताना खूप काळजीपूर्वक अभ्यास करावा लागतो. कारण बरेचदा चावलेला साप आणि अँटी वेनम हे भिन्न असू शकते. सापाच्या एकाच प्रजातीमध्येदेखील प्रचंड भिन्नता आढळून येते. या वेळी संशोधक हिंदुस्थानचे उदाहरण देतात. हिंदुस्थानात सापांपासून बनवले गेलेले अँटी वेनम हे त्याच जातीच्या श्रीलंकेतील सापाविरुद्ध तेवढे प्रभावी ठरत नाही. त्यामुळे संशोधक आता एका खास प्रतिकार करू शकणाऱया औषधाच्या शोधात आहेत. विषात सर्वात घातक ठरणाऱया भागावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा प्रत्येक विषामध्ये समान असणाऱया घटकांवर लक्ष केंद्रित केले आहे.
संशोधनासाठी एलापिड्सना निवडण्यात आले. ही विषारी सापांच्या दोन प्रजातींपैकी एक प्रजाती आहे. या प्रजातीमधील अत्यंत धोकादायक म्हणून ओळखल्या जात असलेल्या मांबा, कोरल साप, क्रेट्स अशा 19 सापांची निवड करण्यात आली. त्यानंतर टीमच्या रक्ताची तपासणी सुरू झाली. यापासून तयार करण्यात आलेल्या अँटी वेनमचा उंदरांवर प्रयोग करण्यात आला. हे उंदीर 19 पैकी 13 सापांच्या विषापासून बचावले गेले, तर इतर 6 सापांच्या विषापासून त्यांना काही प्रमाणात संरक्षण मिळाल्याचे आढळून आले. हे साप अत्यंत विषारी असून यांच्या दंशामुळे अर्धांगवायूचा मोठा धोका असतो.
संशोधकांनी टीमच्या रक्ताला अद्भुत म्हटले आहे. त्याच्या रक्तात मोठय़ा प्रमाणात प्रतिकारशक्ती आढळून आली आहे. मात्र संशोधकांनी हे स्पष्ट केले आहे की, मानवावर या अँटी वेनमचा वापर सुरू करण्यापूर्वी खूप चाचण्या करण्याची आवश्यकता भासणार आहे. या सर्व संशोधनातून निदान एलापिड्ससारख्या अत्यंत विषारी सापांच्या दंशावर एखादे प्रभावी औषध सापडेल किंवा सर्वात उत्तम म्हणजे सर्व प्रकारच्या विषावर काम करेल असे एकच प्रभावी औषध शोधण्यात यश मिळेल अशी आशा संशोधकांना आहे. या संशोधनाला यश मिळो आणि टीमचे स्वप्न साकार होवो अशा शुभेच्छा.