सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरण: साक्षीदारांचे जबाब विश्वासार्ह नाहीत, हायकोर्टात याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद

सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकप्रकरणी साक्षीदारांचे नोंदवलेले जबाब हे विश्वासार्ह नाहीत, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वतीने आज हायकोर्टात करण्यात आला. तसेच सोहराबुद्दीनची पत्नी कौसर बीची गुजरात आणि राजस्थान पोलिसांनी मिळून हत्या केली व त्याचे पुरावे नष्ट करत खोटे साक्षीदार उभे केल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला दिली.

गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकप्रकरणी गुजरातमधील आयपीएस अधिकारी राजकुमार पांडियन यांच्यासह डी. जी. वंझारा, एम. एन. दिनेश आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते, मात्र यातील काही अधिकाऱयांची या खटल्यातून निर्दोष सुटका करण्यात आली. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन शेख याने हायकोर्टात ऍड. गौतम तिवारी यांच्यामार्फत आव्हान दिले असून आज बुधवारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर त्यावर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी ऍड. तिवारी यांनी युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगितले की, गुजरात पोलिसांनी सोहराबुद्दीनला दुसरीकडे ताब्यात घेऊन तिसरीकडे अटक दाखवण्यात आली आणि त्यानंतर त्याची बनावट एन्काऊंटरमध्ये हत्या केली. कौसर बीचा मृतदेह जाळून तिच्या मृतदेहाची राख साबरमती नदीत टाकण्यात आल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.